युपी विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांना युतीची ऑफर दिली होती. मी मायावतींना मेसेज पाठवला होता, मात्र सीबीआय आणि ईडीच्या भीतीने त्यांनी काँग्रेससोबत युपी विधानसभा निवडणूक लढवली नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या दाव्यावर बसपा प्रमुख मायावतींनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन युतीची ऑफर दिल्याचे राहुल गांधींचे विधान निराधार असल्याचे मायावती म्हणाल्या. मला ईडीची भीती वाटत असल्याने बसपा भाजपाप्रती मवाळ असल्याचा काँग्रेस नेत्याचा आरोप चुकीचा आहे, असे मायावती म्हणाल्या. “बसपा भाजपाला घाबरत असल्याचा राहुल गांधींचा आरोप आणि त्यांनी आम्हाला युतीबद्दल विचारले आणि मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि मी त्याला प्रतिसाद दिला नाही, हे सगळं पूर्णपणे खोटं आहे,” असं बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटलंय.

राहुल गांधींवर निशाणा साधत मायावती म्हणाल्या की, राहुल गांधींच्या वक्तव्यातून दलित आणि बसपा यांच्याबद्दल त्यांची हीन भावना आणि द्वेष दिसून येतो. राहुल गांधींवर ताशेरे ओढत मायावती म्हणाल्या की, “काँग्रेस पक्ष आपलं विखुरलेलं घर सांभाळण्यास असमर्थ आहे, परंतु तरीही आमच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. बसपावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी राहुल गांधींनी १०० वेळा विचार करावा,” असे मायावती म्हणाल्या.

“मायावतींना युपी निवडणुकीत ऑफर दिली पण त्यांनी…”; राहुल गांधींचा खुलासा

मायावती म्हणाल्या की, भाजपा आणि आरएसएस भारताला केवळ ‘काँग्रेस-मुक्त’ बनवत नाहीयेत तर ‘विरोधक-मुक्त’ देखील करत आहेत. चीनप्रमाणे देशात एकाच पक्षाची सत्ता स्थापन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप मायावती यांनी केला. तसेच राहुल गांधींची खिल्ली उडवत मायावती म्हणाल्या की, “ज्या पक्षाचा नेता संसदेत पंतप्रधानांना जबरदस्तीने मिठी मारतो आणि जगभर ज्याची खिल्ली उडवली जाते तो पक्ष आम्ही नाही,” अशी खरपूस टीका मायावती यांनी केली आहे.