scorecardresearch

“देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला हरवलं”, आपचा भाजपाला खोचक टोला

MCD Election : “दहा वर्षापूर्वी आमचा छोटासा गरीब पक्ष बनला होता ना निवडणूक…”

“देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला हरवलं”, आपचा भाजपाला खोचक टोला
अरविंद केजरीवाल ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

छोटी विधानसभा मानली जाणाऱ्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने ( आप ) स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दिल्ली पालिकेत भाजपाच्या १५ वर्षांच्या सत्तेला ‘आप’ने सुरुंग लावला आहे. दिल्लीत विधानसभेनंतर महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची सत्ता स्थापन होईल. त्यामुळे दिल्ली पालिकेत आता ‘आप’चा महापौर बसणार आहे.

दिल्ली पालिका निवडणुकीत २५० जागांसाठी लढत झाली. त्यामध्ये ‘आप’ला १३४ जागा, भाजपाला १०४, काँग्रेस ९ आणि अपक्ष ३ असे उमेदवार निवडून आले. १३४ जागा जिंकत ‘आप’ने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर ‘आप’चे खासदार राघव चड्डा यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या पक्षाला हरवले, असं राघव चड्डा यांनी म्हटलं आहे. ते ‘एनडीटीव्ही’शी बोलत होते.

हेही वाचा : “केजरीवालांना हलक्यात घेऊ नका, अन्यथा….”, योगगुरु बाबा रामदेव यांचा भाजपाला सल्ला

“दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपाने ७ मुख्यमंत्री, १७ केंद्रीय मंत्री, १०० खासदार, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, जेलमध्ये असलेल्या एका महाठगला ( सुकेश चंद्रशेखर ) देखील स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरवलं होतं. काहीपण करा अरविंदर केजरीवाल यांना रोखा. पण, विधानसभेनंतर दिल्लीतील जनतेने महापालिकेची चावी केजरीवालांच्या हाती दिली आहे. तसेच, संदेश दिला की काम करणाऱ्यांना मतदान देतो, बदनाम करणाऱ्यांना नाही,” असे राघव चड्डा यांनी म्हटलं.

हेही वाचा : “आम्हाला पंतप्रधानांचे आशीर्वाद आणि केंद्राचं…”; ‘आप’च्या ऐतिहासिक विजयानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

“दहा वर्षापूर्वी आमचा छोटासा गरीब पक्ष बनला होता. ना निवडणूक लढता येत होती, ना कोणती संसाधने होती. साधारण लोकांमुळे हा पक्ष उभा राहिला. दहा वर्षात या छोट्याशा पक्षाने आज दोन राज्यात सरकार बनवलं आहे. छोट्या पक्षाचे दिल्ली, पंजाब, गोवा आणि आता गुजरातमध्येही आमदार येतील. देशातील या छोट्या पक्षाने जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला हरवण्याचे काम केलं,” असं राघव चड्डा यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 16:45 IST

संबंधित बातम्या