MEA clarifies on women journalists exclusion in Taliban Press meet : आफगाणिस्तानच्या तालिबानी नेत्यांचा भारत दौरा वादात सापडला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर झालेल्या पत्रकार परिषदेत महिलांना प्रवेश नाकारल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका झाल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना स्थान न देण्यामध्ये आपला कोणताही सहभाग नव्हता, असे त्यांनी सांगितले आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीवर आणि त्यांनी भारतात उघडपणे ‘जेंडर बायस’ दाखवल्याबद्दल अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केली आहे. “परराष्ट्र मंत्रालयाचा काल दिल्लीत अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोणताही सहभाग नव्हता,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. शुक्रवारी दूतावासात अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी माध्यमांना संबोधित करण्यासाठी आले, तेव्हा महिला पत्रकारांना बाहेर ठेवण्यात आले होते आणि केवळ पुरुष माध्यम प्रतिनिधीच उपस्थित होते.
राहुल गांधींची टीका
या मु्द्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे “मोदी, जेव्हा तुम्ही महिला पत्रकारांना सार्वजनिक व्यासपीठावर वगळण्याची परवानगी देता, तेव्हा तुम्ही भारतातील प्रत्येक महिलेला हेच सांगत असता की तुम्ही त्यांच्याकरिता उभे राहण्यासाठी खूप कमकूवत आहात. इथे आपल्या देशात, महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान सहभागाचा अधिकार आहे. अशा भेदभाच्या पार्श्वभूमीवर तुमचे मौन तुमच्या ‘नारी शक्ती’ या घोषणांमधील पोकळपणा उघड करते,” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
केरळच्या वायनाडमधून खासदार असलेल्या प्रियांका गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, कृपया तालिबानच्या प्रतिनिधीच्या भारत भेटीदरम्यानच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या घटनेबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा.”
“जर महिलांच्या हक्कांबाबतची तुमची भूमिका केवळ निवडणूक जिंकण्यासाठीचा दिखावा नसेल, तर मग भारतातील सर्वांत सक्षम महिलांपैकी असलेल्या महिला पत्रकारांचा अपमान कसा काय होऊ दिला?”, असा प्रश्नही प्रियांका गांधी यांनी केला आहे.
शुक्रवारी तालिबानचे नेते आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही मोजक्या पत्रकारांचाच सहभाग होता, तर एकही महिला पत्रकार नव्हती. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी बैठक झाल्यानंतर काही तासांतच अमीर खान मुत्ताकी यांनी नवी दिल्लीतील अफगाण दूतावासात ही पत्रकार परिषद घेतली होती.