Indian Nurse Nimisha Priya in Yemen : केरळमधील नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशी देण्यात येणार होती. मात्र, निमिषा प्रियाला देण्यात येणारी फाशी तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत निमिषा प्रियाला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करणारी याचिका भारताच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तेव्हा भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना सांगितलं होतं की निमिषा प्रिया प्रकरणात वाटाघाटी सुरू असून सध्या तरी तिला धोका नाही.
दरम्यान, निमिषा प्रिया प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी ८.३ कोटी रुपये जमवण्याच्या मोहिमेसंदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. या मेसेजच्या तथ्याची तपासणी परराष्ट्र मंत्रालयाने केली असून हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच निमिषा प्रियासाठी सरकारशी संलग्न कोणतीही अशा प्रकारची मोहीम सुरू करण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, “निमिषा प्रिया प्रकरणात भारत सरकारच्या बँक खात्यात आर्थिक मदतीच्या संदर्भात सोशल मीडियावर काही दावे केले जात आहेत. मात्र, हा दावा संपूर्ण खोटा आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, केए पॉल नावाच्या एका एक्स अंकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आलेली असून त्यामध्ये म्हटलेलं आहे की, “निमिषाला वाचवण्यासाठी थेट भारत सरकारच्या बँक खात्यात आर्थिक मदत करा. आम्हाला ८.३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.” मात्र, हा मेसेज खोटा असल्याचं आता परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
We have seen claims being made on social media seeking monetary contributions into a GoI designated bank account in the Nimisha Priya case. This is a fake claim.https://t.co/stxeFevl64 pic.twitter.com/4gQGIO4gvP
— MEA FactCheck (@MEAFactCheck) August 19, 2025
दरम्यान, निमिषा प्रियाच्या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “आम्ही या प्रकरणावर बारकाईने निरीक्षण करत आहोत. सर्वतोपरी मदत करत आहोत. आम्ही या मुद्द्यावर काही मैत्रीपूर्ण सरकारांच्या संपर्कात आहोत.”
Donate directly to Save Nimisha to the Government of India account designate . We need 8.3 crore rupees . pic.twitter.com/6tKTr7n3HH
— Dr KA Paul (@KAPaulOfficial) August 19, 2025
नेमकं प्रकरण काय?
निमिषा प्रिया ही २००८ साली कामानिमित्त येमेन येथे गेली होती आणि तिचे कुटुंब केरळमध्येच होते. तिने २०१५ साली मेहदी याच्याबरोबर स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यापूर्वी तिने इतर अनेक रुग्णालयांमध्ये काम केलं होतं. मेहदी हा तिचा स्थानिक पार्टनर होता. येमेनमध्ये पार्टनर म्हणून स्थानिक व्यक्तीला उद्योगात बरोबर घेण्यासंबंधीचा कायदा आहे.
येमेनमध्ये क्लिनिक सुरू करण्यासाठी निमिषा प्रिया हिने तलाल अब्दो मेहदीला बरोबर घेतलं. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि निमिषा प्रिया हिने मेहदीवर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला. यामधून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर निमिषा प्रियाचा पासपोर्ट मेहदीने घेतला. पासपोर्ट परत घेण्यासाठी प्रियाने कथितपणे त्याला सेडेटिव्हजचे इंजेक्शन दिले. पण त्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर येमेनमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना निमिषा प्रियाला अटक करण्यात आली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने निमिषा प्रियाला २०२० साली मृ्त्यूदंडाची शिक्षा दिली. तिच्या कुटुंबियांनी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पण २०२३ साली ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तिला १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. पण आता पुढील आदेशापर्यंत ही फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.