Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी एका माजी मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. माजी मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूतची हत्या सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केली होती. या प्रकरणातील आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे सध्या तुरुंगात आहेत.

सौरभ राजपूत हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आता आरोपी मुस्कान रस्तोगीबाबत आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी मुस्कान रस्तोगीने उत्तर प्रदेशातील मेरठ तुरुंग प्रशासनाकडे संपर्क साधला असून न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्यासाठी तिने कायदेशीर शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करत त्यासाठी कायद्याचा अभ्यास करण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

दरम्यान, आरोपी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन तिच्या ३५ वर्षीय पतीची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणात न्यायालयाने मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या दोन्ही आरोपींना मेरठमधील चौधरी चरण सिंह जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलेलं आहे. मात्र, मुस्कान रस्तोगीने केलेल्या कृत्यामुळे तिला तिच्या कुटुंबाकडून पुरेसा पाठिंबा मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आरोपी मुस्कान रस्तोगी न्यायालयात स्वत:ची बाजू मांडण्यासाठी आणि स्वतःचा खटला लढण्यास ती तयार असल्याचं तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

तसेच तुरुंगातील एका अधिकाऱ्याने असंही निदर्शनास आणून दिलं आहे की, मुस्कान रस्तोगीने आठवीपेक्षा जास्त शिक्षण घेतलेलं नाही. तसेच तिच्याकडे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणाचे देखील कोणतंही प्रमाणपत्र नाही. त्यामुळे भारतात कायदेशीर शिक्षण घेण्यासाठी ही अट आवश्यक आहे. त्यामुळे तिला प्रथम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उत्तीर्ण करावं लागेलं. तसेच अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरुंग अधीक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली?

दरम्यान, तुरुंग अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मुस्कान रस्तोगी तुरुंगात असल्यापासून तिच्या कुटुंबातील कोणीही तिला भेटायला आलेलं नाही, तर साहिल शुक्लाला त्याची आजी आणि भाऊ त्याला भेटायला आले होते. आता मुस्कान रस्तोगीने कायदेशीर शिक्षण घेण्यासाठी प्रक्रिया आणि परवानगी मागितली आहे. आम्ही त्याबाबत विचार करत आहोत. जर तिला शिक्षण घ्यायचं असेल तर तुरुंग प्रशासन तिला आवश्यक असलेले सर्व संसाधने पुरवेल.” दरम्यान, पोलिसांनी नुकतंच मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाच्या विरोधात न्यायालयात १,००० पेक्षा जास्त पानांचं सविस्तर आरोपपत्र दाखल केलं आहे.