Meerut Women Elop with Husbands Brother: मेरठमध्ये काही महिन्यापूर्वी मुस्कान रस्तोगी प्रकरण गाजले होते. मुस्कानने तिच्या पतीचा प्रियकरासह मिळून खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते निल्या ड्रममध्ये पुरले. यानंतर मेरठमधून आता पुन्हा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. पत्नी माझ्या दाढीला कंटाळून दीराबरोबर पळून गेली, असा दावा एका पतीने केली होती. माझी दाढी पत्नीला आवडत नव्हती. त्यामुळे तिने माझ्या भावासह पळ काढला, असा दावा पतीने केला होता. मात्र आता सदर महिला समोर आली असून तिने पतीबाबत वेगळाच दावा केला आहे.
प्रकरण काय आहे?
सात महिन्यांपूर्वी मोहम्मद शाकीर आणि आर्शी यांचे लग्न झाले होते. त्यांचा लग्नाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाकीरने सफेद झब्बा घातल्याचे दिसत आहे. तर आर्शीने हिरव्या रंगाच्या ड्रेस परिधान केला आहे. लग्नाच्या फोटोत शाकीरला प्रिय असणारी दाढीही दिसत आहे. पण या दाढीमुळे काही महिन्यातच त्याचे वैवाहिक आयुष्य उध्वस्त होईल, याची त्याला बिलकूल कल्पना नव्हती.
लग्नाच्या काही दिवसांनंतर आर्शीने माझ्या दाढीवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. मी दाढी काढून गुळगुळीत चेहरा करावा, असे आर्शी मला सतत सांगत असल्याचा दावा शाकीरने केला. दाढी सारख्या किरकोळ विषयावरून सुरू झालेले भांडण भलत्याच विषयाकडे वळले.
दरम्यान, शाकीरचा भाऊ साबीर आणि आर्शी एकमेकांच्या जवळ आले. साबीर भावाच्या अगदी उलट होता. त्याने दाढी वाढवलेली नाही. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर आर्शीने फेब्रुवारी महिन्यात साबीरसह पळ काढला. तब्बल तीन महिने शाकीरने दोघांचा शोध घेतला. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे त्याने पोलिसांत ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
माझ्या हत्येचा कट रचला
शाकीरने पुढे म्हटले की, आर्सी आणि साबीरचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची मला कुणकुण लागली होती. मी दोघांचे संभाषण रेकॉर्ड करून ठेवले आहे. आर्शीने मला जेवणातून विष देण्याचा किंवा गुंडाकडून माझा खून करण्याची योजना बनविली होती. म्हणजे त्या दोघांच्या मार्गातील अडथळा दूर झाला असता.
आर्शीचा वेगळाच दावा
दरम्यान बुधवारी (३० एप्रिल) आर्शी साबीरसह तिच्या पालकांच्या घरी परतली. यापुढे तिला शाकीरबरोबर राहायचे नसून ती साबीरसह आयुष्य घालवू इच्छिते, असे तिने सांगितले आहे. तसेच शाकीरच्या दाढीमुळे तिने हा निर्णय घेतला नसून तो लैंगिकदृष्ट्या अयोग्य असल्यामुळे त्याच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतल्याचेही आर्शीने सांगितले. आर्शीने हा आरोप करताच निराश झालेल्या शाकीरने पोलीस ठाण्यातच पत्नीला घटस्फोट देऊन टाकला.