पीटीआय, बंगळूरु : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे विधान करीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, ‘‘सीमाप्रश्नावर माझे सरकार कोणतीही तडजोड करणार नाही,’’ असे शनिवारी ठामपणे स्पष्ट केले.  

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने सीमावादासंदर्भात शहा यांची शुक्रवारी भेट घेतली होती. त्यावर शुक्रवारी रात्री उशिरा बोम्मई यांनी ट्वीट संदेशाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात, ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे.’’ हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि तेथे आमची बाजू  न्याय्य आणि मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असेही बोम्मई यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

बोम्मई म्हणाले, ‘‘मी कर्नाटकच्या खासदारांच्या शिष्टमंडळाला सीमा प्रश्नासंदर्भात सोमवारी अमित शहा यांची भेट घेण्यास सांगितले आहे. तसेच या प्रश्नावर कर्नाटकची न्याय्य भूमिका विशद करण्यासाठी आपणही शहा यांची लवकरच भेट घेणार आहोत.’’

सीमावादावर मध्यस्थीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी सांगितले होते. या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा भडकला आहे. दोन्ही राज्यांतील नेते आरोप-प्रत्यारोप आणि प्रक्षोभक वक्तव्येही करीत आहेत. बेळगाव या सीमाभागातील जिल्ह्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र समर्थक कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. दोन्ही बाजूंनी शांतता, कायदा-सुव्यवस्था राखण्यावर उभयपक्षी सहमती झाली होती.

बोम्मई काय म्हणतात याला अर्थ नाही : बावनकुळे

नागपूर : सीमावादावर दोन्ही बाजूंनी प्रक्षोभक वक्तव्ये केली जाता कामा नयेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय म्हणतात किंवा आम्ही काय म्हणतो याला काहीही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सीमाप्रश्न कायमचा सुटेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाल द्यावा, असेही ते म्हणाले.

दोन्ही मुख्यमंत्र्यांची पुढील आठवडय़ात शहांबरोबर बैठक?

बंगळूरु : आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून चिघळलेल्या सीमावादाबाबत कर्नाटकची भूमिका आणि वस्तुस्थिती याबाबतची सविस्तर माहितीही त्यांना दिली आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले. गृहमंत्री शहा पुढील आठवडय़ात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

‘पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी’

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या नागपूर दौऱ्याच्या अनुषंगाने शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, पंतप्रधान मोदी यांनी सीमा प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शनिवारी केली. ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विधानावरही टीका केली.

मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्यास सांगितले आहे. मीही लवकरच अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना कर्नाटकच्या न्याय्य भूमिकेबद्दल माहिती देणार आहे. 

– बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री कर्नाटक