टीव्ही अती पाहून डोळे अधिक बिघडतात की टीव्ही, असा प्रश्न पडणाऱ्या ‘टीव्ही उपभोगी’ युगात घरोघरी टीव्ही गुलामांचे वारसदार सापडतात. अमेरिकेतील अशाच तीन टीव्ही गुलामांनी मात्र आपले छोटय़ा पडद्यावरील प्रेम गिनेज बुकात कोरून ठेवले आहे. या तिघांनी सतत ८७ तास म्हणजे पाच दिवस दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम अखंडितपणे पाहण्याचा विक्रम केला. टीव्ही भुकेची ही भीमरूपी पाहणी विचित्र वाटत असली, तरी त्याला विश्वविक्रमाचे कोंदण लाभले आहे.
डॅन जॉर्डन, स्पेन्सर लारसन, ख्रिस लॉलिन असे या टीव्हीप्रेमी त्रिकुटाचे नाव आहे. लासवेगास येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ग्राहक मेळाव्यात टिव्हीओच्या बूथवर त्यांनी विक्रम केला. या महिन्यात नेवाडा येथील लासवेगास येथे हा मेळावा झाला होता. अर्थात या दूरचित्रवाणी प्रेक्षकांना गिनेज बुकच्या नियमानुसार नैसर्गिक विधी व डुलकी घेण्यासाठी दर तासाला पाच मिनिटे विश्रांती दिली होती. हे टीव्ही प्रेक्षक तासाला पाच मिनिटे विश्रांती घेऊन डुलकी काढून येत होते. त्यात त्यांना पाच मिनिटांच्या विश्रांतीशिवाय एका वेळी ८० मिनिटे झोपायची परवानगी होती, असे गिनेज बुकच्या निवेदनात म्हटले आहे. जे कार्यक्रम या लोकांनी पाहिले ते अगोदर प्रक्षेपित झालेले कार्यक्रम होते. या स्पर्धकांची नियमित वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यांना दूरचित्रवाणी वाहिन्या बदलण्याची परवानगी होती. तसेच खाद्यपदार्थ खाण्याची व पेये घेण्याची परवानगी होती. त्यांना वाचण्याची व फोनवर बोलण्याची परवानगी नव्हती. विश्रांती काळात मात्र फोनवर बोलण्याची परवानगी होती. हा बराच मोठा आठवडा वाटला पण मजा आली, असे जार्डन यांनी सांगितले. २०१२ मध्ये कारिन श्रिवेस व जेरेमिया फ्रँको यांनी ट्वेंटिथ सेंच्युरी फॉक्स होम एंटरटेनमेंट मेळ्यात लॉस एंजलिस येथे ‘द सिम्पसन’ ही मालिका ८६ तास पाहण्याचा विक्रम केला होता.