Mexican Navy Ship Crashes : मेक्सिकन नौदलाचं एक जहाज न्यू यॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रिजवर आदळलं असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी या जहाजामध्ये तब्बल २७७ प्रवाशी प्रवास करत होते. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. तसेच यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती न्यू यॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिली आहे.

न्यू यॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, “जहाजावरील २७७ पैकी १९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि २ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे”, अशी माहिती एरिक अॅडम्स यांनी दिली आहे. तसेच जहाजावरील कोणताही सदस्य नदीत पडला नसल्याचंही अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, मेक्सिकन नौदलाचं जहाज न्यू यॉर्कच्या एका ब्रिजवर आदळल्याच्या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अपघात होण्यापूर्वीचा क्षण कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, बंदरावर उभे असलेले अनेक जहाज दिसून आले आहेत. तसेच एक दिव्यांनी सजलेलं जहाज जात असताना दिसत आहे. मात्र, यावेळी हे जहाज ब्रुकलिन ब्रिजवर आदळल्याचं दिसत आहे. या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पण स्थानिक वेळेनुसार रात्री ८:२६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यावेळी जहाजात असलेले पांढऱ्या पोशाखातील अनेक खलाशी बाहेर उतरत असल्याचे दिसले. तसेच जहाज किनाऱ्याकडे येताच त्या ठिकाणी काही लोक पळून जात असल्याचंही दिसून आलं. सध्या न्यू यॉर्क अग्निशमन विभागासह स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे मेक्सिकन नौदलाचं जहाज असून ते १५ देशांमधील २२ बंदरांना भेट देणार होतं. मात्र, या जहाजाला न्यू यॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजवर अपघात झाला.