Lawh Wa Qalam: M.F. Husain Museum Qatar: जगप्रसिद्ध चित्रकार दिवंगत एम. एफ. हुसेन यांना समर्पित असलेल्या ३,००० चौरस मीटरच्या संग्रहालयाचे २८ नोव्हेंबर रोजी कतार येथे उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे नाव ‘लॉह वा कलाम: एम. एफ. हुसेन संग्रहालय’ असे असून, याची घोषणा कतार फाउंडेशनच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे.
या संग्रहालयात एम. एफ. हुसेन यांनी १९५० पासून २०११ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत निर्मित केलेल्या विविध कलाकृतींचा समावेश असणार आहे. “मकबूल फिदा हुसेन हे जगातील महान आधुनिकतावाद्यांपैकी एक होते, एक कलाकार ज्यांचा दृष्टिकोन विविध संस्कृतींमधून उदयास आला. त्यांची नाळ सर्व संस्कृतींशी जुळलेली होती, ज्यामध्ये कतारचाही समावेश होता”, असे कतार फाउंडेशनचे कम्युनिटी एंगेजमेंटचे कार्यकारी संचालक खुलूद एम. अल-अली यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
एम. एफ. हुसेन यांच्यावर हिंदू देव-देवतांचे नग्न चित्रण करून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अनेक खटले दाखल करण्यात आले होते. याचबरोबर भारतमातेचे नग्न चित्रण करून मातृभूमीचा अपमान केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर एम. एफ. हुसेन यांनी २००६ मध्ये भारत सोडून कतारला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २०१० मध्ये कतारने दिलेला नागरिकत्वाचा प्रस्ताव स्वीकारला, त्यानंतर ते भारताचे परदेशी नागरिक बनले होते.
हे संग्रहालय एम. एफ. हुसेन यांनी स्वतः केलेल्या एका रेखाचित्रावर आधारित आहे, ज्यामध्ये त्यांच्या स्थापत्य दृष्टिकोनाचा समावेश होता. ही संकल्पना त्यांनी एक कलाकृती म्हणून मांडली होती, जी त्यांच्या आयुष्यभराच्या प्रयोगशीलतेचे प्रतिबिंब आहे. या रेखाचित्रात एक गडद निळ्या रंगाची रचना आणि एक उंच, पांढरा, मिनारसारखा दंडगोलाकार टॉवर आहे. त्यावर ‘एम. एफ. हुसेन आर्ट अँड सिनेमा म्युझियम’ असे शीर्षक देखील आहे.
या संग्रहालयात चित्रे, चित्रपट, टेपेस्ट्री, छायाचित्रण आणि कविता यांचा समावेश असलेला कायमस्वरूपी संग्रह मल्टिमीडिया वापरून कथेच्या स्वरूपात सादर केला जाईल, ज्यामध्ये छायाचित्रे, व्हिडिओ आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश असेल.