दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलचा २७वा सामना खेळवण्यात आला. यात मुंबईने चेन्नईवर ४ गड्यांनी सरशी साधली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या कायरन पोलार्डने अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावा करत सामना आपल्या बाजुने फिरवला.

 

यंदाच्या आयपीएलमधील वेगवान अर्धशतक

या सामन्यात पोलार्डने १७ चेंडूत अर्धशतक साकारले. हे या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. पोलार्डने आपल्या ८७ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याच्या या वादळी खेळीमुळे मुंबईने चेन्नईविरुद्धच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला. या विजयाच्या जोरावर चेन्नईविरुद्ध मुंबईने सर्वाधिक वेळा (१९) विजय प्राप्त केले आहेत.

धावांचा पाठलाग करताना मुंबईचा विक्रम

धावांचा पाठलाग करताना शेवटच्या १० षटकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मुंबईने स्वत: चा विक्रम मोडला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मुंबईने १० षटकात १३८ धावा कुटल्या. तर, २०१९मध्ये मुंबईने पंजाबविरुद्ध शेवटच्या १० षटकात १३३ धावा केल्या होत्या. यातही पोलार्डने ३१ चेंडूत ८३ धावांची खेळी केली होती.

असा रंगला सामना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या वादळापुढे चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज अपयशी ठरले आणि मुंबईने आयपीएलमधील चेन्नईविरुद्धचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीला २ चौकार आणि एक षटकार खेचत सामना आपल्या बाजूने फिरवला. चेन्नईने मुंबईसमोर विजयासाठी २१९ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, पोलार्डमुळे मुंबईने चेन्नईवर ४ गडी राखून विजय नोंदवला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.