मुंबई इंडियन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. आयपीएलमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलच्या इतिहासातील त्याचा सर्वात महागडा स्पेल टाकला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सीएसकेच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. अंबाती रायुडूने २७ चेंडूत ७२ धावा फटकावल्या. या डावात रायडूने ४ चौकार आणि ७ षटकार लगावले. अंबाती रायुडूने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. बुमराहने टाकलेल्या १७व्या षटकात रायुडू आणि जडेजा यांनी २१ धावा वसूल केल्या. या धावांमुळे बुमराहने नकोशा विक्रमाची नोंद केली. चेन्नईच्या फलंदाजांनी बुमराहच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये एकूण ५६ धावा कुटल्या. बुमराहला १ विकेट घेत आली. बुमराहशिवाय धवल कुलकर्णीही महागडा ठरला. त्याने ४ षटकांत ४८ धावा दिल्या.

जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये याआधी दोनदा ५०पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. २०१५च्या आयपीएल मोसमात त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध एकूण ५५ धावा दिल्या होत्या. याच हंगामात त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ५२ धावा खर्च केल्या होत्या.

मुंबईच्या ‘महागडया’ गोलंदाजांमध्ये मलिंगा अव्वल

मुंबई इंडियन्सकडून सर्वात महागड्या स्पेलच्या विक्रमात लसिथ मलिंगा अव्वल आहे. त्याने २०१७मध्ये पंजाबविरुद्ध ४ षटकांत ५८ धावा दिल्या होत्या. या विक्रमापासून बुमराह फक्त २ धावांनी दूर राहिला. हार्दिक पांड्याने २०१९च्या मोसमात पंजाबविरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत ५७ धावा दिल्या होत्या.

असा रंगला सामना…

मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या वादळापुढे चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज अपयशी ठरले आणि मुंबईने आयपीएलमधील चेन्नईविरुद्धचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या लुंगी एनगिडीला २ चौकार आणि एक षटकार खेचत सामना आपल्या बाजूने फिरवला. चेन्नईने मुंबईसमोर विजयासाठी २१९ धावांचे आव्हान ठेवले होते. पण, पोलार्डमुळे मुंबईने चेन्नईवर ४ गडी राखून विजय नोंदवला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.