मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ) सत्या नाडेला यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बडे प्रस्थ असणाऱ्या नाडेला आणि मोदी यांच्यातील चर्चेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाल्याचे समजते. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा सत्या नाडेला यांचा इरादा असल्याचे समजत आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या महत्वाकांक्षी मोहीमेबरोबरच अन्य महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर नाडेला यांनी दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांचीदेखील भेट घेतली. या भेटीत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहीमेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांवर चर्चा झाली. या भेटीबद्दल बोलताना नाडेल यांनी ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. मायक्रोसॉफ्ट ही बहुराष्ट्रीय कंपनी असली तरी, भारतीय उद्योग आणि देशाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळेच ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमा आमच्यासाठीही प्राधान्याचा मुद्दा असल्याचे नाडेला यांनी सांगितले.
अॅमेझॉनचे जेफ बेझोस, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांच्यानंतर नाडेला हे पंतप्रधान मोदींची भेट घेणारे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तिसरी मोठी व्यक्ती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft ceo satya nadella meets pm narendra modi
First published on: 27-12-2014 at 04:09 IST