मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचे त्यांच्याच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची कंपनीकडून चौकशी सुरु होती. द वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत अशापद्धतीचे संबंध ठेवणे नियमांचे उल्लंघन असल्याने प्रकरणाची चौकशी सुरु असताना अब्जाधीश असणाऱ्या बिल गेट्स यांनी बोर्डाच्या सदस्यपदी कायम राहणं नैतिकतेला धरुन नसल्याचा निर्णय २०२० मध्ये बोर्डाने घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टच्या एका महिला इंजिनिअरने कित्येक वर्ष बिल गेट्स आणि आपल्यात लैंगिक संबंध असल्याचा आरोप पत्रातून केला होता. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्ड सदस्यांनी २०१९ मध्ये एका कायदा कंपनीला नियुक्त केलं होतं. जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने ही सांगितल्यानुसार चौकशी पूर्ण होण्याआधीच बिल गेट्स यांनी राजीनामा दिला.

२७ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट

बिल गेट्स यांच्या एका प्रवक्त्याने जर्नलला दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षांपूर्वी हे संबंध होते आणि मैत्रीपूर्ण परिस्थितीत ते संपवण्यात आले. बोर्डातून बाहेर पडण्याचा त्यांच्या निर्णयाचा या प्रकरणाशी काही संबंध नव्हता असा दावाही त्यांनी केला आहे.

बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडत असताना आता आपण लोककल्याणावर लक्ष केंद्रीत करणार असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान असोसिएट प्रेसला पाठवलेल्या मेलमध्ये मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, “२००० मध्ये जेव्हा बिल गेट्स यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली तेव्हा आम्ही या प्रकरणी चिंता व्यक्त केली होती. कंपनीने याप्रकरणी चौकशीदेखील केली. या संपूर्ण चौकशीदरम्यान तक्रार करणाऱ्या महिलेला पूर्ण मदत देण्यात आली.”

दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा यांचं लग्न १९९४ साली झालं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft investigated bill gates before he left board sgy
First published on: 17-05-2021 at 09:50 IST