बँकॉक : म्यानमारमध्ये नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचा एक माजी कायदे मंडळ सदस्य, एक लोकशाहीवादी कार्यकर्ता आणि गेल्या वर्षी लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या हिंसाचारातील दोन आरोपी अशा चार जणांना फाशी देण्यात आल्याची माहिती सोमवारी म्यानमार सरकारतर्फे देण्यात आली.
५० वर्षांत येथील सरकारने असा मृत्युदंड देण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारच्या मालकीच्या डेली मिरर दैनिकात ही माहिती देण्यात आली आहे. या चारही राजकीय कैद्यांना क्षमा करण्यात यावी, अशी मागणी जगभरातून करण्यात येत होती. यात संयुक्त राष्ट्रे आणि कंबोडिया यांचाही समावेश होता. असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नॅशन्स या संघटनेच्या अध्यक्षपदी कंबोडिया आहे. या चारही जणांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हत्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी नेमकी कोणत्या दिवशी झाली, त्याची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर म्यानमारबाहेर स्थापन झालेल्या दी नॅशनल युनिटी सरकारचे मानवाधिकार मंत्री आंग मियो मिन यांनी म्हटले आहे की, ज्या चौघांना फाशी देण्यात आले, त्यांनीही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात भाग घेतला नव्हता. लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी त्यांना फाशी देण्यात आले आहे, असा दावा त्यांनी केला.