पीटीआय, लडाख : लडाखच्या टुर्टुक क्षेत्रात शुक्रवारी लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळून झालेल्या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला, तर १९ जखमी झाले. पर्तापूर येथील लष्करी छावणीतून २६ जवानांना घेऊन हनिफ उपक्षेत्राकडे निघालेले वाहन शुक्रवारी सकाळी ९च्या सुमारास अंदाजे ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत कोसळले, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली. या दुर्घटनेत सात जवानांचा मृत्यू झाला, तर १९ गंभीर जखमी झाले. त्यांना पर्तापूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु नंतर हरयाणातील चंडी मंदिर येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘‘लडाखमधील दुर्घटनेने दु:खी झालो. आम्ही आमचे शूर जवान गमावले आहेत. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे’’, असे ट्वीट मोदी यांनी केले. दरम्यान, या अपघाताबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याशी चर्चा केली. जनरल पांडे यांनी संरक्षणमंत्र्यांना एकूण परिस्थिती आणि जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली.

महाराष्ट्रातील विजय शिंदे यांना वीरमरण 

वाई : लडाख येथे लष्कराचे वाहन नदीत कोसळून झालेल्या अपघातात साताऱ्यातील खटावचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण आले आहे. शिंदे हे विसापूर (ता. खटाव) गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे  खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शिंदे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.