scorecardresearch

“३०६ खासदार असूनही मोदी तक्रार करतात की…”, असदुद्दीन ओवेसींचा खोचक टोला; नितीश कुमारांनाही केलं लक्ष्य!

ओवेसी म्हणतात, “यापेक्षा एखादं खिचडी सरकार आलं तर चांगलं होईल. एखादा कमकुवत पंतप्रधान सत्तेत येईल. त्यामुळे..!”

“३०६ खासदार असूनही मोदी तक्रार करतात की…”, असदुद्दीन ओवेसींचा खोचक टोला; नितीश कुमारांनाही केलं लक्ष्य!
असदुद्दीन ओवेसींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला!

एकीकडे राज्यात शिवसेनेतील बंडखोरी, शिंदेंच सरकार आणि शिंदेगट-शिवसेना यांच्यातील वितुष्ट या घडामोडी घडत असताना दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या आघाडीचा चेहरा म्हणून कधी ममता बॅनर्जींचं नाव घेतलं जातं, कधी शरद पवार तर कधी नितीश कुमार. बिहारमध्ये दोनच दिवसांत सत्ताबदल करून राजदच्या पाठिंब्यावर पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमार यांची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अहमदाबाद दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे.

नितीश कुमार यांच्यावर टीका

“भाजपासमवेत असताना नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. गोध्रा कार्यक्रमावेळीही ते भाजपासोबत होते. त्यांनी २०१५मध्ये भाजपाची साथ सोडली, २०१७मध्ये पुन्हा भाजपासोबत गेले. २०१९च्या निवडणुका सोबत लढून नरेंद्र मोदींच्या विजयात वाटा उचलला. पण आता त्यांनी पुन्हा भाजपाला सोडलंय. दुसरीकडे ममता बॅनर्जी देखील आधी एनडीएमध्ये होत्या. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुकही केलं होतं”, असं ओवेसी म्हणाले.

अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरून नाराजी

दरम्यान, देशात अल्पसंख्याकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा ओवेसींनी यावेळी उपस्थित केला. “जेव्हा जेव्हा आम्ही अल्पसंख्याकांचा विकास आणि त्यांच्यासाठी न्यायाबाबत बोलतो, तेव्हा थातुरमातुर उत्तरं दिली जातात. जे आज धर्मनिरपेक्षतेचे तज्ज्ञ म्हणून स्वत:ला मिरवतात, ते आता ठरवणार की कोण धर्मनिरपेक्ष आहे आणि कोण जातीय आहे”, असं ते म्हणाले.

“भाजपाकडे आज जवळपास ३०६ खासदार आहेत. मात्र, तरीदेखील पंतप्रधान तक्रार करतात की ही व्यवस्था त्यांना काम करू देत नाही. देशातले गरीब, शेतकरी आणि तरुणांना मदत करण्यासाठी त्यांना अजून किती ताकदीची गरज आहे? यापेक्षा एखादं खिचडी सरकार आलं तर चांगलं होईल. एखादा कमकुवत पंतप्रधान सत्तेत येईल. त्यामुळे देशातल्या गरीबांना त्याचा फायदा होईल”, असंही ओवेसींनी म्हटलं.

कमकुवत पंतप्रधान यावा, या विधानामधून ओवेसींनी नेमका कुणाच्या दिशेनं सूचक इशारा केला? याविषयी आता तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.