पीटीआय, वॉशिंग्टन / नवी दिल्ली

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी दिलेल्या अणुहल्ल्याच्या धमकीतून तो अतिशय बेजबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे सिद्ध झाले असून आपण अण्वस्त्रांच्या धमक्यांना भीक घालत नाही, हे पुन्हा स्पष्ट करतो, अशा शब्दांत सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाने मुनीर यांचा समाचार घेतला. ‘अण्वस्त्रांची धमकी’ हे पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण असून अमेरिकेसारख्या भारताच्या मित्रराष्ट्राच्या भूमीवर केलेली ही विधाने धक्कादायक असल्याचा टोलाही भारताने लगावला.

मुनीर दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. फ्लोरिडा येथील ताम्प येथे पाकिस्तानी समुदायासमोर बोलताना त्यांनी अणुहल्ल्याची धमकी दिल्याची माहिती आहे. ‘आम्ही अण्वस्त्रसज्ज देश आहोत. आमचे अस्तित्व धोक्यात आले, तर आमच्याबरोबर निम्म्या जगाला घेऊन उद्ध्वस्त होऊ,’ असे बेजबाबदार विधान त्यांनी केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. मुनीर यांच्या या विधानांवर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक जारी करून प्रतिक्रिया दिली. ‘‘जेव्हा-जेव्हा अमेरिका पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा देते, तेव्हा त्यांचे खरे रंग समोर येतात. पाकिस्तानमध्ये लोकशाही अस्तित्वात नसून लष्कराचेच नियंत्रण असल्याचे हे द्याोतक आहे. अमेरिकेने मुनीर यांना पायघड्या घालून त्यांना चिथावणी दिल्याने आता पाकिस्तानमध्ये बंड अटळ आहे. आताचे फील्ड मार्शल पाकिस्तानचे अध्यक्ष होतील. पाकिस्तानने वेळोवेळी अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या आहेत. मुनीर यांचे विधान दक्षिण आशियामधील आण्विक अस्थिरताही दर्शवते. नागरी सत्तेऐवजी लष्कराच्या हातात अण्वस्त्रांच्या चाव्या आहेत, हे यातून दिसते,’’ अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

मुनीर काय म्हणाले?

भारताबरोबर नुकत्याच झालेल्या संघर्षात पाकिस्तानने निर्धाराने आणि जोरकसपणे प्रत्युत्तर दिले. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा नाही. तो अपूर्ण राहिलेला आंतरराष्ट्रीय विषय आहे, अशा शब्दांत मुनीर यांनी पुन्हा काश्मीरचा राग आळवला. तसेच पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी थांबविण्यासाठी कुठलेही धरण भारताने बांधले, तर आम्ही ते उद्ध्वस्त करू अशी धमकीही दिली. सिंधू नदी ही भारताची कौटुंबिक मालमत्ता नाही. भारताने केलेले नियोजन कोलमडून पाडण्यासाठी आमच्याकडे संसाधने कमी नाहीत, असा इशारा मुनीर यांनी दिला आहे.

मुनीर यांच्या या अत्यंत बेजबाबदार विधानामधून आंतरराष्ट्रीय समुदायाने योग्य तो निष्कर्ष काढायला हवा. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी गटांचे साटेलोटे पुन्हा अधोरेखित झाल्याने तेथील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत शंकांना बळकटी मिळाली आहे. – परराष्ट्र मंत्रालय

मुनीर हे सातत्याने बेजबाबदार भडकाऊ विधाने करीत आहेत. अमेरिका अशा व्यक्तीला विशेष महत्त्व देते, ही बाब विचित्र आहे. काँग्रेस या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करते. – जयराम रमेशसरचिटणीस, काँग्रेस.