मोबाईल खरेदी करण्यासाठी १७ वर्षीय अल्पवयीन नवऱ्यानं बायकोलाच विकलं; धक्कादायक प्रकारानंतर आरोपीला अटक!

मोबाईल विकत घेण्यासाठी, हॉटेलमध्ये जेवण्यासाठी अल्पवयीन नवऱ्याने पत्नीचा केला १ लाख ८० हजारात सौदा!

man sells wife to buy mobile phone
प्रातिनिधिक छायाचित्र

लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात एका अल्पवयीन नवऱ्यानं आपल्या बायकोलाच विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या कुटुबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. त्यानंतरही मुलीला विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या गावकऱ्यांनी “आम्ही तिला विकत घेतलंय, सोडणार नाही”, असं म्हणत पोलिसांनाच आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. महिला सबलीकरण आणि महिला सशक्तीकरणाच्या कितीही चर्चा झाल्या, तरी वास्तवात परिस्थिती बदलायला अजून बरेच प्रयत्न आवश्यक असल्याची प्रतिक्रिया यावर व्यक्त होऊ लागली आहे.

कामाच्या बहाण्याने राजस्थानला आला आणि…

हा सगळा प्रकार राजस्थानमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीने जुलै महिन्यात ओडीशामध्ये या अल्पवनीय मुलीशी विवाह केला होता. त्यानंतर कामासाठी म्हणून तो तिला घेऊन रायपूर, झाशी मार्गे राजस्थानमध्ये आला. इथे वीटभट्टीवर त्याने काम करायला देखील सुरुवात केली. मात्र, महिन्याभरातच त्यानं आपल्या पत्नीला राजस्थानच्या बारन जिल्ह्यातल्या एका गावात राहणाऱ्या ५५ वर्षीय वयोवृद्धाला विकलं!

१ लाख ८० हजारा केला पत्नीचा सौदा

आरोपी पतीनं आपल्या पत्नीचा १ लाख ८० हजार रुपयांना सौदा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऑगस्ट महिन्यात पत्नीला विकल्यानंतर जेव्हा हा आरोपी आपल्या गावी परत गेला, तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात विचारणा केली. त्यावर तीनेच आपल्याला सोडल्याचा बनाव आरोपीने केला. कुटुंबीयांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर घडला प्रकार समोर आला.

पत्नीला विकून त्या पैशातून घेतला मोबाईल!

दरम्यान, आरोपीने आपल्या पत्नीला विकून त्या पैशातून चैन केल्याचा प्रकार ऐकून पोलीस आणि कुटुंबीयांनाही धक्का बसला. ५५ वर्षांच्या वृद्धाकडून घेतलेल्या १ लाख ८० हजार रुपयांमधून आपण एक स्मार्टफोन विकत घेतल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. तसेच, पंचतारांकित हॉटेल्समध्ये जेवल्याचं देखील त्याने सांगितलं.

गावकरी म्हणतात, “आम्ही तिला विकत घेतलंय”

आरोपीच्या चौकशीनंतर पीडित मुलीचा ठावठिकाणा समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने राजस्थानच्या बरन जिल्ह्यात धाव घेतली. मात्र, ज्या गावात मुलीला विकण्यात आलं होतं, तिथल्या गावकऱ्यांनी चक्क पोलिसांना तिला घेऊन जायला विरोध केला. “आम्ही तिला १ लाख ८० हजार रुपये देऊन विकत घेतलं आहे. त्यामुळे आम्ही तिला घेऊन जाऊ देणार नाही”, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. अखेर बळजबरीने या मुलीला सोडवण्यात आलं.

संबंधित आरोपीला न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या अल्पवयीन मुलीला विकत घेणाऱ्या ५५ वर्षीय वृद्धावर काय कारवाई झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minor husband sell wife to buy phone dine in hotel in rajasthan pmw

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या