जवळपास सहा महिन्यांपासून देशात ब्रिजभूषण सिंह हे नाव चर्चेत आहे. त्याला कारण ठरलंय देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंचं आंदोलन. राजधानी दिल्लीत काही महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटू आणि प्रशिक्षकही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यासंदर्भात एकीकडे नुकतीच केंद्र सरकार आणि कुस्तीपटूंची यशस्वी बैठक पार पडली असताना दुसरीकडे ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या ७ महिला कुस्तीपटूंपैकी एका अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी आपण लैंगिक छळाचे खोटे आरोप केल्याचा धक्कादायक दावा केला आहे. पीटीआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
आंदोलनाला धक्का?
दोनच दिवसांपूर्वी कुस्तीपटू आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यात आंदोलनाबाबत यशस्वी चर्चा झाली. यानुसार १५ जूनपर्यंत या प्रकरणात तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्याची मागणी सरकारनं मान्य केली. तसेच, कुस्ती महासंघाच्या पुढील निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह किंवा त्यांचे सहकारी निवडून येणार नाहीत, ही मागणीही सरकारनं मान्य केली आहे. यासह इतरही मागण्या सरकारनं मान्य केल्या असताना आता या घडामोडींमुळे आंदोलनाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
काय म्हणणंय अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचं?
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर रागातून लैंगिक छळाचे खोटे आरोप केल्याचं मान्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेचा दाखला देण्यात आला असून त्यासंदर्भातली ऑडिओ क्लिपदेखील ट्वीट करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अंडर १७ एशियन चॅम्पियनशिप चाचणी मालिकेत लखनौमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात या अल्पवयीन कुस्तीपटूचा पराभव झाला होता. यासाठी ब्रिजभूषण सिंह जबाबदार असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.
“…म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो”
“या सामन्यासाठी रेफरी फेडरेशननं नियुक्त केला होता. फेडरेशनचे प्रमुख ब्रिजभूषण आहेत. मग आमचा कुणाविरोधात राग असेल? हा फक्त कुस्तीच्या एका सामन्याचा मुद्दा नाही. ती एका वर्षाची मेहनत होती”, असं त्यांनी म्हटलं आहे. “मला कुणीही मोर्चात सहभागी व्हायला सांगितलं नव्हतं. मी स्वत:हून गेलो. कुस्तीपटूंचं आंदोलन होतं. त्यांच्यावर अन्याय झाला तसा माझ्यावरही अन्याय झाला होता. म्हणून मी आंदोलनात सहभागी झालो होतो”, असंही ते म्हणाले.
“न्यायालयात सत्य समोर येण्यापेक्षा आत्ताच सत्य समोर येणं योग्य ठरेल. आता दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली आहे. सरकारनं माझ्या मुलीच्या पराभवाची न्याय्य चौकशी करण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आपली चूक सुधारणं हे माझंही कर्तव्य आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.