Mira Murati’s AI Startup Thinking Machines Lab : जगभरातील एआय कंपन्या, एआय लॅब्स प्रतिभावान संशोधक व कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. एआयच्या जगात आघाडी मिळवण्यासाठी किंवा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा चालू आहे. त्यामुळे या कंपन्या जगभरातील उत्तमोत्तम संशोधकांना शोधण्यासाठी आक्रमक शोधमोहिमा राबवत आहेत, गलेलठ्ठ पगाराच्या ऑफर्स देत आहेत. मार्क झुकरबर्ग यांनी मेटाच्या नवीन सुपरइंटेलिजन्स युनिटसाठी आठ दिग्गज ओपनएआय संशोधकांना त्यांच्या कंपनीत दाखल करून घेतलं आहे. परंतु, एआयच्या शर्यतीत आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करणारे झुकरबर्ग हे काही एकटे नाहीत. त्यांच्यासमोर अनेक दिग्गजांचं आव्हान आहे.

बिझनेस इन्सायडरच्या वृत्तानुसार ओपनएआयच्या माजी सीईओ मीरा मुराती यांनी सुरू केलेली सिक्रेट एआय स्टार्टअप कंपनी थिंकिंग मशीन्स लॅब तांत्रिक जगातील प्रतिभेच्या शोधात असून या क्षेत्रातील संशोधकाला मोठ्या प्रमाणात पगार देत आहे. या एआय स्टार्टअप कंपनीने अद्याप कोणतंही उत्पादन सादर केलेलं नाही. तरीदेखील ही कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बेस सॅलरी (मूळ पगार) म्हणून तब्बल ५ लाख डॉलर्स (४.३ कोटी रुपये) देत आहे. ही बेसिक सॅलरी असून यात इतर अलाउन्सेस, बोनस, साइन-इन बोनस व इक्विटीचा समावेश नाही. त्यामुळे हा पगार पाच कोटींहून अधिक असू शकतो.

थिंकिग मशीन्स लॅबच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना कंपनी ४.५० लाख डॉलर्स इतका पगार देत आहे. तर याच टीममध्ये आता पाच लाख डॉलर्सपर्यंतचा पगार असलेली पदं भरली जात आहेत. मशीन लर्निग तज्ज्ञांनाही तितकाच पगार ऑफर केला जात आहे.

फेडरल फायलिंगद्वारे पगाराची माहिती समोर

कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहिती सहसा सार्वजनिक करत नाही. परंतु, ही रक्कम समोर आली आहे कारण अमेरिका वगळता इतर देशांमधील नागरिकांना (Non-US Citizens) एच-१बी व्हिसावर कामावर घेताना कंपन्यांना संबंधित कागदपत्रे (फेडरल फायलिंग) सादर करावी लागतात. हा डेटा या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमधील आहे. म्हणजेच मुराती यांनी २ अब्ज अमेरिकन डॉलर्स सीड फंडिंग उभारण्यापूर्वीची माहिती आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात निधी उभारल्यानंतर आता कंपनीचं मूल्य १० अब्ज डॉलर्स इतकं झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एआय लॅब्समध्ये तगडी स्पर्धा, तंत्रज्ञांना मोठी मागणी

आघाडीच्या एआय कंपन्या आणि लॅब्समधील तगड्या स्पर्धेमुळे या क्षेत्रातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ व इंजिनिअर्सना गलेलठ्ठ पगार असलेल्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी अलीकडेच आरोप केला होता की मार्क झुकरबर्ग यांनी त्यांची कंपनी मेटा एआय तज्ज्ञांना १०० मिलियन डॉलर्सच्या सायनिंग बोनससह आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अलीकडेच ओपनएआयमधील आपल्या पदाचा राजीनामा देऊन मेटामध्ये दाखल झालेल्या लुकास बेयर यांनी हा दावा फेटाळला आहे.