मिझोरममधील नाथियल जिल्ह्यातील मौदार येथे दगडाची खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. खाणीमध्ये मजूर काम करत असताना त्यांच्यावर दगड कोसळले आहेत. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित ४ मजुरांचा शोध सुरू आहे. मजुरांचा शोध घेण्यासाठी बचावपथक, स्थानिक लोक, बीएसएफ, आसाम रायफल यांना पाचारण करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> G20 Summit: कंबोडियाचे पंतप्रधान रात्री पोहोचले आणि सकाळी करोना पॉझिटिव्ह, त्यांनी भेट घेतलेले बायडन मोदींसह सर्वांच्या भेटीला
मिळालेल्या माहितीनुसार मिझोरममधील मौदार येथे एका खासगी कंपनीत मजूर काम करत होते. दुपारचे जेवण करून ते नुकतेच कामावर परतले होते. मात्र यावेळी अचानकपणे दगडाची खाण कोसळल्यामुळे जवळपास १२ मजूर दगडांखाली दबले गेले. सोबतच उत्खननासाठी लागणारी यंत्रेदेखील दगडाखील दबली गेली. या घटनेची माहिती होताच शेजारील गावातील ग्रामस्थ तसेच काही स्वयंसेवक धटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दगडांखील दबलेल्या मजुरांन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सीमा सुरक्षा दल, तसेच आसाम रायफल्सच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले.
हेही वाचा >>>जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले “माझ्याकडे…”
या सर्व पथकांकडून बचावकार्य केले जात असून आतापर्यंत ८ मृतदेह सापडले आहेत. दगडांखील आणखी ४ कामगार दबल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांचा शोध सुरू आहे. दगडाच्या खाणीत दबलेले सर्व स्थलांतरित मजूर आहेत.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर बाहेर काढलेल्या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाईल. अजूनही शोधकार्य सुरूच आहे. दगडाखाली दबलेले सर्व मजूर सापडेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने सांगितले आहे.