Raj Thackeray And Uddhav Thackeray Reunion: राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्राच्या विरोधातील लढ्यात आघाडीची भूमिका घेतलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे स्वागत केले आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीला कडाडून विरोध दर्शवला आहे.
या धोरणाच्या अंमलबजावणीसंबंधीचे आदेश राज्य सरकारने मागे घेतल्याचा विजय साजरा करण्यासाठी, शनिवारी त्यांनी ‘मराठीचा आवाज’ हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २००५ नंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, “एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत”, असे जाहीर केले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे त्रिभाषा सूत्राच्या विरोधात आघाडीवर आहेत. त्रिभाषा सूत्रांतर्गत, पहिलीपासून विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा आणि किमान एक अन्य भारतीय भाषा यासह तीन भाषा शिकणे बंधनकारक आहे.
एम. के. स्टॅलिन यांनी असा दावा केला आहे की, केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार तामिळनाडूमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषांच्या जागी त्रिभाषा धोरणाद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न करीत आहे.
शनिवारी झालेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये, स्टॅलिन म्हणाले की, “भाषेच्या हक्कांसाठीचा संघर्ष राज्यांच्या सीमा ओलांडून पुढे गेला आहे आणि तो आता महाराष्ट्रात वादळाप्रमाणे जोर धरत आहे.”
“हिंदी सक्तीचा पराभव करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तामिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या केलेला भाषा हक्कांचा संघर्ष आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात निषेधाच्या वादळाप्रमाणे जोर धरत आहे”, असे स्टॅलिन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक करताना, स्टॅलिन म्हणाले की, “उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती असेल आणि प्रगतीशील बिगर हिंदी भाषिक राज्यांमधील लोकांवर हिंदी का लादली जात आहे, या मनसे प्रमुखांच्या प्रश्नांना केंद्राकडे कोणतेही उत्तर नाही.”
दरम्यान, तामिळनाडू त्यांच्या राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करत नसल्यामुळे निधी जारी न केल्याबद्दल मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे. याचबरोबर हिंदी शिकल्याने लोकांना नोकऱ्या मिळतील, असा दावा करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली आहे.