इंदूर : मध्य प्रदेशात एका महिलेवर बलात्कार प्रकरणी गेले सहा महिने फरारी असलेला आरोपी व काँग्रेस आमदाराचा पुत्र करण मोरवाल याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. करण हा उज्जैन जिल्ह्यातील बडनगर येथील आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा आहे.

त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी आधी २५ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. करण मोरवाल याच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळाल्यानंतर शाजापूर जिल्हयात माकसी गावात त्याला अटक करण्यात आली.  इंदूरपासून हे ठिकाण ८० कि.मी अंतरावर आहे. त्याला अटक करण्यात आल्याची माहिती इंदूरच्या महिला पोलिस ठाण्याच्या प्रमुख ज्योती शर्मा यांनी ही माहिती  दिली. महिला पोलिस अधिकारी व गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने आरोपीला तो त्याच्या साथीदारासह मोटारीतून फिरत असताना अटक केली. राहुल राठोड याच्या मोटारीतून तो  फिरत होता. फरार असताना तो या गावात लपून बसला होता नंतर तो काही काळ ठिकाणे बदलत होता.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राठोड याचा यात काही सहभाग होता का याचा तपास केला जात आहे. अटक केल्यानंतर मोरवाल याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचे जाबजबाब घेण्यात आले. त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून कोठडी देण्यात आली आहे.

महिला तक्रारदाराने असा आरोप केला होता की, करण मोरवाल याने विवाहाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. १९ ऑक्टोबरला पोलिसांनी आरोपीचा भाऊ शिवम याची चौकशी करून करणचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला होता.  दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, आमदार मुरली मोरवाल १९ ऑक्टोबरला पलासिया पोलीस ठाण्यात आले ेहोते. तेथे त्यांनी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचवेळी पत्रकारांनी त्यांना मुलाच्या ठावठिकाण्याबाबत विचारले होते, तेव्हा ते निघून गेले होते. माध्यमांशी आपण बोलणार नाही, असे ते म्हणाले होते.