निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजाणीतून भारतीय निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवणारे आणि राजकारण्यांमध्ये दरारा निर्माण करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे रविवारी रात्री ९.३० वाजता चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन शेषन यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगासारख्या संस्थाच्या स्वायत्ततेचं महत्व जपणारा अधिकारी देशात नाही याहून अधिक दु:खद परिस्थिती काय असू शकते, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. “भारताच्या निवडणूक आयोगाच्या इतिहासाची जर मांडणी करायची झाली तर टी. एन. शेषन यांच्या आधीचा निवडणूक आयोग आणि शेषन यांच्या नंतरचा निवडणूक आयोग अशी करावी लागेल इतका जबरदस्त ठसा त्यांनी उमटवला. निवडणूक आयोग किती निष्पक्ष आणि प्रभावी असू शकतो याचा वस्तुपाठच त्यांनी समोर ठेवला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत निवडणूक आयोगासारख्या संस्थाच्या स्वायत्ततेचं महत्व जाणणारा अधिकारी देशात नाही याहून अधिक दु:खद परिस्थिती काय असू शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टी. एन. शेषण यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” या शब्दांमध्ये राज यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शेषन यांचा परिचय

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांची १२ डिसेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. त्यानंतरची सहा वर्षांची त्यांची कारकिर्द ऐतिहासिक ठरली. मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होताच त्यांनी निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलला. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक केली. आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करून त्यांनी राजकारण्यांमध्ये निवडणूक आयोगाचा धाक निर्माण केला. त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत सुधारण घडवून आणल्या. त्यांच्या आधी त्यांच्याएवढे धाडस क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याने दाखवले असेल. ते निवृत्त झाल्यानंतर आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यांचा कित्ता गिरवला. निवडणूक आयोग ही लोकशाहीतील महत्त्वाची स्वायत्त संस्था असून ती राजकीय हस्तक्षेपापलिकडे असते, याची जाणीव शेषन यांच्या कार्यपद्धतीमुळेच नागरिकांना प्रथमच प्रकर्षांने झाली.

शेषन यांचा जन्म केरळमधील पलक्कड जिल्ह्य़ात झाला होता. ते १९५५च्या तुकडीचे आयएएस अधिकारी होते. ते १९९० ते ९६ या काळात मुख्य निवडणूक आयुक्त होते. शेषन यांना प्रतिष्ठेच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray paid tribute to t n seshan scsg
First published on: 11-11-2019 at 17:11 IST