Model Murder : एका मॉडेलचा मृतदेह हरियाणातल्या सोनिपत या ठिकाणी आढळून आला. गळा चिरलेल्या अवस्थेत हा मृतदेह एका कालव्यापाशी फेकण्यात आला होता. या मॉडेलचं नाव शीतल असून ती हरियाणवी संगीत विश्वात कार्यरत होती. तिची हत्या कुणी केली आणि त्यामागे नेमकं काय कारण होतं? याचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी शीतलचा बॉयफ्रेंड सुनीलला अटक केली आहे. सुनीलने पोलीस तपासात गुन्हा कबूल केला आहे. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
शीतल आणि सुनील या दोघांचेही प्रेमसंबंध होते. मात्र सुनील विवाहीत आहे आणि त्याला दोन मुलंही आहेत. शीतलची त्याने हत्या केली तसंच हत्या करण्याच्या आधी या दोघांचं भांडणही झालं होतं. सुनीलने तिला मारहाण केली होती. तो तिला सिम्मी म्हणायचा. कालव्याजवळ तिचा मृतदेह फेकण्याआधी त्याने तिच्यावर शारिरीक अत्याचारही केले होते अशीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना सुनील पानिपत येथील रुग्णालयात असल्याचं समजलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने शीतलची हत्या केल्याचं मान्य केलं. शीतलची हत्या नसून कार अपघात आहे असा बनाव रचण्याचाही त्याने प्रयत्न केला.
१४ जून रोजी नेमकं काय घडलं?
१४ जूनला म्हणजेच शनिवारी शीतल अहर या गावात आली. हे गाव पानिपत येथील आहे. ती तिथे तिच्या अल्बमचं शूट करण्यासाठी आली होती. सुनील तिथे तिला भेटायला आला. रात्री १०.३० ला तो तिला आपल्या बरोबर कारमध्ये बसवून घेऊन गेला. त्यावेळी या दोघांनी मद्यपान केलं आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला. पहाटे १.३० वाजता शीतलने तिच्या बहिणीला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी तिने तिच्या बहिणीला म्हणजेच नेहाला हे सांगितलं होतं की सुनील मला मारहाण करतो आहे. नेहा तिच्यापर्यंत त्यावेळी पोहचू शकली नाही. तसंच नंतर शीतलचा फोनही स्विच ऑफ झाला. सुनीलने शीतलची हत्या केली आणि तिला कारसह कालव्यात फेकलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
१५ जूनला काय घडलं?
१५ जूनच्या दिवशी म्हणजेच रविवारी हरियाणा पोलिसांना सुनीलची कार सापडली. पण शीतल बेपत्ता होती. दरम्यान सुनील रुग्णालयात गेला त्याने सांगितलं की त्याची कार कालव्यात पडली आहे. शीतल बुडाली आहे. मी कसाबसा जीव वाचवून बाहेर पडलो आहे, असं त्याने रुग्णालयात सांगितलं आणि तो तिथे दाखल झाला. शीतल बेपत्ता झाल्याने तिचा शोध सुरु होता.
१६ आणि १७ जूनला काय घडलं?
१६ जूनला म्हणजेच सोमवारी शीतल या हरियाणवी मॉडेलचा मृतदेह पोलिसांना गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. शीतलच्या अंगावर असलेल्या टॅटूंवरुन तिची ओळख पटली. तिच्या हातावर आणि छातीवर टॅटू होते. तिच्या अंगावर अनेक वार होते असंही पोलिसांनी सांगितलं. शीतलचा मृतदेह साधारण ८० किमी पर्यंत वाहात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आज म्हणजेच १७ जूनला पोलीस सुनीलपर्यंत पोहचले त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शीतलच्या हत्येची कबुली दिली.