करोनाची लस निर्मिती करणाऱ्या मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बैेसेल यांनी करोनाची साथ कधी संपणार आहे यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे. स्टीफन यांनी करोना लसीकरणाच्या संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लवकरच करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार असल्याचं मत व्यक्त केलंय. स्टीफन यांच्या मते पुढील वर्षभरामध्ये करोनाची साथ पूर्णपणे संपेल. जागतिक मागणीनुसार आज जगभरातील अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन घेतलं जात आहे. त्यामुळेच लवकरच करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल असं स्टीफन म्हणाले आहेत.

परिस्थिती कधीपर्यंत आधीसारखी होणार?

गुरुवारी स्वित्झर्लंडमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॉडर्नाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर भविष्याबद्दल काय वाटतं यासंदर्भात भाष्य केलं. “जगभरामध्ये फारच वेगाने लसींची निर्मिती केली जात आहे. याच वेगाने उत्पादन होत राहिल्यास पुढील वर्षापर्यंत मध्यापर्यंत जगभरातील सर्व लोकांसाठी लस उपलब्ध होईल,” असा विश्वास स्टीफन यांनी व्यक्त केलाय. परिस्थिती कधी करोनापूर्व काळाप्रमाणे होणार या प्रश्नावर उत्तर देताना, “मला अपेक्षा आहे की एका वर्षभरामध्ये परिस्थिती पूर्वीप्रमाणे सामान्य होईल,” असं म्हटलंय.

…तर पुन्हा संसर्गाची भीती

तसेच स्टीफन यांनी लसीकरण करुन घेण्याचं आव्हान केलं आहे. जे लोक लसीकरण करुन घेत आहेत ते भविष्यात या विषाणूमुळे होणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित राहतील असं स्टीफन म्हणाले आहेत. तसेच जे लोक लस घेणार नाहीत त्यांना डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग होऊन रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची पुन्हा वेळ येऊ शकते असा इशाराही स्टीफन यांनी दिलाय.

बूस्टरची गरज भासणार

स्टीफन यांनी येणाऱ्या काळामध्ये लोकांना करोना लसींचा बूस्टर डोस घेण्याची गरज पडू शकते असंही म्हटलं आहे. मॉडर्ना सध्या याचसंदर्भात काम करत असून सध्या दिल्या जाणाऱ्या लसींच्या ५० टक्के क्षमता असणाऱ्या लसींच्या उत्पादनासंदर्भात काम सुरु असल्याचं स्टीफन म्हणाले. तसेच त्यांनी कंपनी डेल्टा ऑप्टिमाइज व्हेरिएंटवर म्हणजेच डेल्टा संसर्गावरही परिणाम कारण ठरणाऱ्या लसींवरही काम करत असल्याचं स्पष्ट केलं. २०२२ मध्ये दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसमध्ये अशाप्रकारच्या लसी असणार आहेत.

दावा फोल ठरण्याची शक्यता

एकीकडे विकसित देशांमध्ये अगदी वेगाने लसीकरण होत असलं तरी दरडोई उत्पन्न कमी असणाऱ्या देशांमधील केवळ दोन टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच स्टीफन यांनी केलेलं हे वक्तव्य केवळ विकसित देशांमधील लसीकरणावर आधारित असल्याचं आणि वर्षभरामध्ये करोनाची साथ संपुष्टात येण्याची शक्यता तुलनेने कमीच दिसत आहे.