भाजपप्रणीत एनडीए सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे नेते आहेत, अशा शब्दांत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, पण नंतर त्यांनी सारवासारव करताना आपण मोदी यांच्यामुळे प्रभावित झालेलो नाही असे त्या म्हणाल्या.
करण थापर यांनी ‘हेडलाइन्स इंडिया’ या वाहिनीसाठी घेतलेल्या मुलाखतीत त्यांना असे विचारण्यात आले होते, की मोदी यांच्यामुळे तुम्ही प्रभावित झाला आहात काय, यावर त्यांनी मोदी हे आत्मविश्वास असलेले नेते आहेत. त्यांना दूरदृष्टी आहे, पण अजून त्यांना बोले तैसा चाले हे दाखवून द्यायचे आहे.
त्यांचा प्रभाव पडतो की नाही हे सांगणे फार घाईचे होईल, पण त्यांचा आपल्यावर प्रभाव पडला आहे. ते आत्मविश्वास असलेले नेते आहेत व भाजप एकटय़ाच्या ताकदीवर सत्तेवर आल्याने तसा आत्मविश्वास अपेक्षितही आहे. ते दूरदृष्टीचे नेते आहेत, पण ती दूरदृष्टी प्रत्यक्ष वापरात दिसली पाहिजे.
 मोदी रोज काही ना काही नवीन विकास कार्यक्रम जाहीर करीत आहेत. त्यात मेक इन इंडिया, अच्छे दिन आयेंगे ही घोषणा यांचा समावेश आहे, पण त्यासाठी वेगाने बदल, वेगवान नोकरशाही, भ्रष्टाचारमुक्तता यांची जरूर आहे.