‘कोटी कोटी मतदारांनी माझ्यासारख्या फकिराची झोळी भरली’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड बहुमताचा स्वीकार केला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी सकाळपासूनच गर्दी केलेल्या तमाम कार्यकर्त्यांचेही मोदींनी आभार मानले. भाजपच्या ऐतिहासिक निवडणुकीच्या यशाचा आनंद जरूर साजरा करा, पण नम्रता विसरू नका, असा सल्लाही मोदींनी कार्यकर्त्यांना दिला.

केंद्रात सत्ता बहुमतामुळे मिळते, पण देश सार्वमतावर चालवला जातो. विरोधकांनाही बरोबर घेऊन देशाचा विकास करायचा आहे. देशहिताचा प्रत्येक निर्णय लोकशाहीच्या आणि राज्यघटनेच्या चौकटीतच घेतला जाईल आणि त्यात भाजपचे कार्यकर्तेही उस्त्फूर्तपणे सामील होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. मोदींचे भाषण सुरू असताना पाऊस सुरू झाला. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, मेघराजही भाजपच्या यशाचा साक्षीदार बनला आहे!

नवा भारत हा २१व्या शतकातील भारत असून भाजपला मिळालेला विजय म्हणजे इमानदार सरकारची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांच्या आशा-आकांक्षांचे यश असल्याचा निर्वाळा मोदींनी दिला. युवा, महिला, मध्यमवर्ग, शेतकरी, असंघटित कामगार अशा विविध समाजांतील विचारांचे प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात पडले आहे. २०व्या शतकात जगणाऱ्या राजकीय पंडितांना मात्र हा नवा भारत दिसला नाही, असा टोला मोदींनी लगावला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्टय़ विशद करताना मोदी म्हणाले की, ‘‘धर्मनिरपेक्षतेचा बनावट मुखवटा पूर्णपणे गळून पडला असून कोणाही विरोधकाने धर्मनिरपेक्षता हा शब्दही प्रचारात उच्चारण्याची हिंमत

केली नाही. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर निवडणुका लढवल्या जात असत. यावेळी मात्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. प्रत्येक निवडणुकीत महागाई हा कळीचा मुद्दा असे. यावेळी महागाईचा नामोल्लेखही नव्हता.’’

‘‘जातीपातीचे राजकारण करून महाआघाडी करणाऱ्यांनाही मतदारांना धडा शिकवला आहे,’’ असे सांगून मोदी म्हणाले की, ‘‘गरीब आणि त्यांना गरिबीतून मुक्त करू पाहणारे अशा दोनच जाती आता देशात उरल्या आहेत. स्वतंत्र भारताला समृद्ध भारताकडे घेऊन जायचे आहे,’’ असे ते म्हणाले. १९४२ ते १९४७ या स्वातंत्र्य चळवळीच्या पाच वर्षांची तुलना मोदींनी पुढील पाच वर्षांशी (२०१९-२४) केली.

भाजपचा राजकीय प्रवास ‘दो से दोबारा’ असा झाला आहे. भाजपच्या जागा कधी दोन होतील कधी दोनशे, पण भाजप लोककल्याणाच्या ध्येयापासून कधीही विचलित होत नाही. पूर्ण बहुमतातील सरकार पुन्हा पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आले असे तब्बल पन्नास वर्षांनी घडलेले आहे. हा मतदारांनी लोकशाहीवर दाखलेला विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.

‘‘काम करताना चुका होऊ शकतात, पण जाणीवपूर्वक मी कधीही वाईट भावनेने काम करणार नाही. मी व्यक्तिगत फायद्यासाठी काम करणार नाही,’’ असे आश्वासन मोदींनी देशवासींना दिले आणि याच दोन मूल्यांवर माझ्या कामाचे मूल्यमापन करा, असेही मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi also thanked the workers
First published on: 24-05-2019 at 01:30 IST