मोदी सरकारने आणलेल्या पशुधन विधेयकाला जोरदार विरोध झाला आणि यानंतर अखेर सरकारने हे विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेतला. या विधेयकात कुत्रे, मांजरांसह प्राण्यांच्या निर्यातीला परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच विधेयकाचा मसुदा मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देत त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या.
मोदी सरकारच्या या विधेयकात केवळ गाय, बैल, म्हशी यांचीच नाही, तर अगदी कुत्रे, मांजर यांच्याही निर्यातीची तरतूद करण्यात आली होती. यानंतर माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावसकर, अभिनेत्री झिनत अमान, किटू गिडवानी आणि आचर्या लोकेश मुनी यांच्यासारख्या दिग्गजांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. या पशुधन विधेयकाच्या विरोधात सोशल मीडियावर ‘से नो टू लाईव्हस्टॉक बिल २०२३’ असा हॅशटॅगही ट्रेंड करण्यात आला.
“या विधेयकाचा विरोध करताना मी पहिल्या रांगेत असेन”
सरकारच्या या विधेयकानंतर अनेक प्राणीमित्रांना धक्का बसला. सरकार असं विधेयक तयार करण्याचा विचार करू शकतं हे पाहूनच धक्का बसल्याची भावना या प्राणीमित्रांनी व्यक्त केली. एका व्हायरल व्हिडीओत कपिल देव म्हणत आहेत, “प्राणीही आपल्या जीवनाचा भाग आहेत. असं विधेयक मंजूर कसं केलं जाऊ शकतं? आपण सर्वांनी याला विरोध केला पाहिजे. या विधेयकाचा विरोध करताना मी पहिल्या रांगेत असेन.”
व्हिडीओ पाहा :
अभिनेत्री किटू गिडवानी म्हणाल्या, “हे विधेयक मंजूर झालं तर प्राण्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. करुणा आणि अहिंसा कुठे गेली आहे?”
अभिनेत्री झिनत अमान यांनीही या विधेयकाला पूर्णपणे विरोध केला. तसेच या विधेयकाला विरोध करण्याच्या मोहिमेत लोकांनी सहभागी व्हावं, असंही आवाहनही त्यांनी केलं.
हेही वाचा : “चीनने भारताच्या ६५ गस्ती चौक्यांवर ताबा मिळवला, मोदींनी…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे ही संपूर्ण पृथ्वीच आपलं घर आहे, अशा संस्कृतीत या विचाराच्या विरोधात विधेयक आणलं जात असल्याचीही भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.