देशाचे विभाजन करण्याचे पातक काँग्रेसने केले आहे. सरदार पटेलांसह लालबहादूर शास्त्री, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय यांसारख्या तेजस्वी नेत्यांना अडगळीत टाकून केवळ नेहरू-गांधी घराण्याचाच उदोउदो करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. इतिहासाचे विद्रुपीकरणही याच काँग्रेसने केले आहे, अशी खरपूस टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली. त्यांचा रोख पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे होता.
मनमोहन सिंग यांनी शनिवारी रायपूरच्या सभेत मोदींचा उल्लेख टाळत भाजवर टीका केली होती. भाजपचे काही अतिउत्साही नेते आरोप करताना देशाचा इतिहास-भूगोल बदलवून टाकतात अशी टीका पंतप्रधानांनी केली होती. त्याचा समाचार मोदींनी रविवारच्या येथील सभेत घेतला. ते म्हणाले, ‘पंतप्रधानांचे जन्मगाव आता पाकिस्तानात आहे. पाकिस्तानची निर्मिती कोणामुळे झाली. सीमावर्ती भागात चीन दररोज घुसखोरी करतो, असे असतानाही त्याची कोणी दखल घेत नाही. हे असे का घडते.’, असा सवाल करत मोदींनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. ‘देशाचे विभाजन करण्याचे पातक काँग्रेसनेच केले आहे. हा इतिहास कोणीही बदलू शकत नाही.’, असे मोदी म्हणाले.
गांधी-नेहरूंचाच उदोउदो
देशाचे विभाजन करणाऱ्या काँग्रेसने स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक तेजस्वी नेत्यांना अडगळीत टाकून निव्वळ गांधी-नेहरू घराण्याचाच उदोउदो करण्याचे काम केले असल्याचे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर ४१ वर्षांनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ३३ वर्षांनंतर भारतरत्न देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजपने नेहमीच स्वातंत्र्यसैनिकांची तसेच नेत्यांचा सन्मान केल्याचेही मोदी म्हणाले. साबरमती ते दांडी हा ऐतिहासिक मार्ग बदलण्याचा प्रस्ताव अलीकडेच पंतप्रधान कार्यालयाने आपल्याला पाठवल्याचा दावाही मोदींनी केला.
पंतप्रधानांचे जन्मगाव आता पाकिस्तानात आहे. पाकिस्तानची निर्मिती कोणामुळे झाली. चीनच्या घुसखोरीमुळे देशाचा भूगोल दररोज बिघडतो आहे.