पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दर्शनी घोडे आहेत प्रत्यक्षात त्यांनी कोणतीही रेस जिंकलेली नाही. तर काँग्रेस पक्ष काहीसा दुबळा झालेला असला तरी अजूनही रेस जिंकून देणारा घोडा आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिद्धू म्हणाले, पंतप्रधान मोदींनी देशासमोर केवळ खोट्या गोष्टी मांडण्याचा उद्योग केला आहे. आपल्या या खोट्याच्या लाटेमध्येच ते आता बुडणार आहेत. मोदींनी पाच वर्षात घोषीत केलेली सर्व कामे अर्धवट सोडली आहे. गंगेच्या स्वच्छतेसाठी आणलेल्या नमामी गंगे ही योजना २०१९ मध्ये संपेल असे यापूर्वी उमा भारती त्यानंतर नितीन गडकरी यांनी सांगितले होते. यासाठी २० हजार कोटींचा निधीही दिला होता. त्यांपैकी केवळ ६ हजार कोटी रुपये खर्च झालेत. याअंतर्गत होणारे ट्रिटमेंट प्लांटचे केवळ १० टक्केच काम पूर्ण झाले आहे.

अमृतसरमध्ये जालियनावाला बाग हत्यांकाड ट्रस्टचे मोदी चेअरमन आहेत. या ट्रस्टच्या ट्रस्टींची नेमणूका रखडल्या आहेत. पाच वर्षात या ट्रस्टची एकही बैठक झालेली नाही. ४० कोटी रुपयांची यासाठी घोषणा करण्यात आली मात्र, हा निधी अद्याप देण्यात आलेला नाही.

अडीज लाख गावांपर्यंत फेब्रुवारी २०१९ पर्यंत डिजिटल इंडियाची कनेक्टिव्हीटी पोहोचवण्याचे मोठे दावे करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात १ लाख १० हजार गावांपर्यंत केवळ केबलच पोहोचली आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत ४० कोटी तरुणांना ट्रेनिंग मिळणार होते त्यांपैकी ४० लाख लोकांना ट्रेनिंग मिळालं. त्यांपैकी ६ लाख लोकांना प्लेसमेंट मिळाली.

त्याचबरोबर जाहीर करण्यात आलेल्या प्रकल्पांचा वापर केवळ ३ टक्के इतकाच होत आहे. आसाम आणि बिहारमध्ये भाजपाचे सरकार असताना एकही प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही. तीन ट्पप्यात सर्व खासदारांना गावे दत्तक घेण्याचा प्रोग्राम मांडण्यात आला. यातील तिसऱ्या टप्प्यात ७८ टक्के खासदारांनी कोणतेच गाव दत्तक घेतले नाही.