नवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. त्यावरून २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी राज्यांतील ४८ जागा किती महत्त्वाच्या आहेत, हे स्पष्ट झाले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘एनडीए’मध्ये बाळासाहेब ठाकरे व शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक प्रकाशसिंह बादल या दोघांची भूमिका कळीची होती. या दोन्ही पक्षांचे सच्चे अनुयायी या बैठकीत उपस्थित आहेत, असे मोदी म्हणाले. मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नसले तरी, शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तरदायी असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत उद्धव ठाकरेंना टोला दिला.
जुन्या मित्रांचे अभिनंदन आणि नव्या मित्रांचे स्वागत करत असल्याचे मोदी म्हणाले. बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाचे प्रमुख अजित पवारही सहभागी झाले होते. पण, मोदींनी अजित पवारांचा उल्लेख केला नाही! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आवर्जुन उल्लेख केला. शरद पवार, तरुण गोगोई, मुझफ्फर बेग, एस, जमीर, गुलाम नबी आझाद हे नेते नेहमीच भाजपविरोधी राहिले आहेत. तरीही, आम्ही या नेत्यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला, असे मोदी म्हणाले.
मोदींचे अजित पवार यांच्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले असले तरी, त्यांना मोदींच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. पंतप्रधान मोदींच्या शेजारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा बसले होते. त्यांच्या बाजूला शिंदेंना तर त्यांच्यानंतर बसलेल्या अमित शहांच्या शेजारी अजित पवारांना स्थान देण्यात आले होते. शिंदे व अजित पवार यांचे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी तर, प्रफुल पटेल यांचे केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.
बैठकीसाठी मोदींचे स्वागत करण्याचा मान नड्डांसोबत शिंदेंना दिला गेला. मोदींनीही शिंदेंची आपुलकीने विचारपूस केली. बैठकीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक पक्षनेत्याला बोलण्यासाठी सुमारे दहा मिनिटे मिळाली. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकून आणू असे शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत युतीतील तीनही पक्ष एकत्र लढू असे अजित पवार म्हणाले.
राज्यातील पाच पक्ष सहभागी
बैठकीला शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष-आठवले गट, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष व विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष अशा पाच घटक पक्षांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम व रिपब्लिकन कवाडे गट यांना बोलावण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.