Mohammed Shami Wife Hasin Jahan Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ पश्चिम बंगालमधील बीरभूम येथे तिच्या शेजाऱ्यांसोबत भांडण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हसीन जहाँ तिच्या शेजारच्या महिलांसोबत जोरदार वाद घालताना दिसते.
हसीन जहाँ आणि तिची पहिल्या पतीपासूनची मुलगी अर्शी जहाँ यांचे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत जमिनीच्या वादावरून भांडण झाले. असा दावा केला जात आहे की, हसीन बेकायदेशीरपणे जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होती. शेजाऱ्यांनी तिला विरोध केला, तेव्हा वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एका युजरने ही हाणामारी दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने म्हटले आहे की, “पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सुरी शहरात मोहम्मद शमीची विभक्त पत्नी हसीन जहाँ, पहिल्या पतीपासूनची मुलगी अर्शी जहाँ यांच्यावर शेजारी महिलेचा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “सुरीच्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये एका वादग्रस्त जागेवर हसीन जहाँने बांधकाम सुरू केल्यानंतर हा वाद सुरू झाला. ही जागा कथितपणे तिची मुलगी अर्शी जहाँच्या नावावर आहे. बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, हसीन आणि तिच्या मुलीने दलिया खातून यांच्यावर क्रूरपणे हल्ला केल्याचा आरोप आहे.”
अर्शी जहाँ कोण आहे?
अर्शी जहाँ ही हसीन जहाँच्या पहिल्या लग्नापासूनची मुलगी आहे. हसीन गेल्या काही काळापासून तिच्या मुलीसह बीरभूममध्ये राहत आहे. तिला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.
हसीन जहाँचा विभक्त पती मोहम्मद शमीशी दीर्घकाळापासून कायदेशीर आणि वैयक्तिक वाद सुरू आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत. अलिकडेच कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला त्याची पत्नी आणि मुलगी इरा यांच्या देखभालीसाठी ४ लाख रुपयांचा मासिक भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत.