पीटीआय, बंगळुरू
‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तींची संघटना म्हणून ओळखली जाते,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले. ‘संघ नोंदणीकृत संघटना नाही,’ या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेला उत्तर देताना, ‘‘हिंदू धर्मदेखील नोंदणीकृत नाही,’’ असे प्रत्युत्तर डॉ. भागवत यांनी दिले.

‘‘संघावर तीनदा बंदी घालण्यात आली. जर आम्ही तिथे नसतो तर त्यांनी कोणावर बंदी घातली असती,’’ असा सवाल भागवत यांनी येथे केला. नोंदणीशिवाय संघ कार्यरत असल्याच्या काँग्रेस नेत्यांच्या आरोपाला हे उत्तर मानले जाते. हिंदू धर्मदेखील नोंदणीकृत नाही. संघ ही व्यक्तींची संघटना म्हणून ओळखली जाते, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.

‘‘संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली, मग तुम्ही आम्हाला ब्रिटिश सरकारकडे नोंदणी करावी अशी अपेक्षा करता का?’’ असा सवाल भागवत यांनी संघाने आयोजित केलेल्या प्रश्नोत्तर सत्रात एका प्रश्नाला उत्तर देताना केला. स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने नोंदणी अनिवार्य केली नाही, असे त्यांनी नमूद केले. ‘‘आम्हाला व्यक्तींची संस्था म्हणून वर्गीकृत केले आहे आणि आम्ही एक मान्यताप्राप्त संघटना आहोत,’’ असे भागवत यांनी स्पष्ट केले.

तिरंग्याचा नेहमीच आदर

संघ फक्त भगव्या ध्वजाचा आदर करतो आणि भारतीय तिरंग्याला मान्यता देत नाही या मुद्द्यावर भागवत म्हणाले की, संघात भगव्याला गुरू मानले जात असले तरी, भारतीय तिरंग्याचा आम्ही नेहमीच आदर करतो. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अलीकडेच संघावर बंदी घालायला हवी असे म्हटले होते त्या दृष्टीने हे विधान महत्त्वाचे आहे. खरगे यांचे पुत्र व कर्नाटकमधील मंत्री प्रियंक यांनी सार्वजनिक ठिकाणी तसेच सरकारी संस्थांमध्ये संघाच्या कार्यक्रमांवर बंदी हवी अशी मागणी केली होती. तसेच नोंदणी क्रमांक व मदतीच्या स्राोताबाबतही प्रश्न उपस्थित केला होता.

एका पक्षाला पाठिंबा नाही

संघाच्या कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही. आम्ही निवडणुकीच्या राजकारणात भाग घेत नाही. संघाचे काम समाजाला एकत्र आणण्याचे आहे. आम्ही धोरणांना पाठिंबा देतो. अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाचे उदाहरण देत भागवत म्हणाले की संघाच्या स्वयंसेवकांनी त्याला पाठिंबा दिला. भाजपने त्याला समर्थन दिले. जर काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिला असता तर आम्ही त्यांनाही पाठिंबा दिला असता,’’ त्यांनी स्पष्ट केले.