Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. भारताला भारतच म्हणा ती आपली ओळख आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भारताला आता सोने की चिडिया नाही तर वाघ बनावं लागेल असंही मोहन भागवत म्हणाले आहेत. केरळमधल्या कोची या ठिकाणी ज्ञानसभा नावाचं राष्ट्रीय शिक्षा संमेलन पार पडलं. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.

काय म्हणाले मोहन भागवत?

भारत हे एक विशेष नाम आहे. त्याचं भाषांतर करायला नको. इंडिया म्हणजे भारत असं म्हटलं जातं पण भारत हा भारतच आहे. त्यामुळे आपल्या चर्चेत, लेखनात, सार्वजनिक चर्चेत किंवा व्यक्तिगत चर्चेत आपण भारताला भारतच म्हटलं पाहिजे. समजा एखाद्याचं नाव गोपाल असेल तर त्याची ओळख करुन देताना आपण इंग्रजीत He is Mr. cowherd अशी करुन देत नाही. गोपाल हे नाव गोपालच राहतं. तसंच भारताचं नाव भारतच राहिलं पाहिजे. कारण भारत भारत आहे म्हणूनच त्याच्या ओळखीचा सन्मान आहे. जर भारताने त्याची ओळख गमावली तर कितीही गुण असले तरीही तुमचा आदर कुणीही करणार नाही हा जगाचा नियम.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे तुम्ही आहात त्यात उत्कृष्ट बना-मोहन भागवत

जे तुम्ही आहात त्यात तुम्ही उत्कृष्ट बना. विकास, काय असतो विकास? सर्कशीत हत्ती फुटबॉल खेळतो, माकडं सायकल चालवतात. हा त्यांचा विकास नाही. माणूस जसं करतो त्याचं अनुकरण प्राणी करतात. आपण तिकिट काढून तो खेळ बघायला जातो, पण आपण त्यासाठी त्या प्राण्यांना आदर देत नाही. प्राण्यांचा आदर कुठे असतो तर तो त्यांच्या जंगलात. सर्कशीतल्या वाघाला कुणी घाबरत नाही. जंगलातल्या वाघाला आदर मिळतो. त्याची भीती असते. भारतीय शिक्षणात भारतीयत्व असलंच पाहिजे कारण आपण भारतात राहतो असं मोहन भागवत म्हणाले.