नवी दिल्ली: हिंदू-मुस्लिमांमधील अविश्वास दूर केला पाहिजे. एकमेकांना एक दुसऱ्याची भीती दाखवली जाते. पण, तसे होऊ नये. हिंदू संघटित झाला आहे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. भारतात इस्लाम असणारच, त्यांच्याशिवाय देश असू शकत नाही. असा विचार करणारा हिंदू विचारांचा असू शकत नाही असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
आपण सगळे एक आहोत. हे राष्ट्र एक आहे. हिंदू-मुस्लिम हे एकच आहेत. ते सगळे भारतीय आहेत. आक्रमकांची नावे दिली जाऊ नयेत. याचा अर्थ मुस्लिमांची नावे रस्त्यांना नको असे नव्हे असेही भागवत यांनी स्पष्ट केले. भारतातील मुस्लिम अरब वा तुर्क नाहीत, ते युरोपियन नाहीत. ते भारतीय आहेत हे त्यांना कळले तर हिंदूबद्दल विश्वास निर्माण होईल, त्याची हिंदू समाज वाट पाहात आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
‘संघ कोणालाही जबरदस्ती निवृत्त करत नाही. त्यामुळे ना मी निवृत्त होणार, ना इतर कोणाला निवृत्त होण्यास सांगितले जाईल’, असे गुरुवारी विज्ञान भवनातील कार्यक्रमात स्पष्ट केले. भाजपमधील निर्णय संघ घेत नाही वा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावे हेही ठरवत नाही, असे सांगितले.
भाजपचे निर्णय संघ घेत नाही!
संघ आणि भाजपच्या संबंधांवर प्रकाश टाकताना भागवत यांनी, संघ भाजपला नियंत्रित करत नाही, असे स्पष्ट केले. भाजपने मदत मागितली तर आम्ही देतो. तसे आम्ही कोणालाही मदत करायला तयार असतो. भाजपचे निर्णय संघ घेत असता तर भाजपमध्ये नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यास इतका वेळ लागला असता का? आम्ही निर्णय कधीच घेतला असता. पण, भाजपचे निर्णय संघ घेत नाही, अशी टोलेबाजी भागवत यांनी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन देखील भाजपला अजून नवा राष्ट्रीय अध्यक्ष शोधता आलेला नाही. संघ व भाजपमध्ये मतभेद वाढू लागल्याची चर्चा होत आहे, या प्रश्नावर, भागवत यांनी, ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे, असा दावा केला.
हम दो, हमारे तीन…
संघाचा १०० वर्षांचा प्रवासः नवे क्षितीज या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. भागवत यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना अडीच तास समर्पक उत्तरे दिली. लोकसंख्यावाढ व विकासातील योगदान यासंदर्भातील प्रश्नावर भागवत म्हणाले की, भारतातील पालकांनी किमान तीन अपत्ये जन्माला घातली पाहिजेत. देशातील लोकसंख्या कमी होऊ नये व ती स्थिर रहावी यासाठी प्रत्येक कुटंबात किमान तीन मुले जन्माला आली पाहिजेत, असे विधान भागवत यांनी केले. भारतातील जन्मदर २.१ टक्का आहे. हा दर त्यापेक्षा खाली गेला तर लोकसंख्या कमी होत जाईल. हिंदूमधील जन्मदर वेगाने कमी झाला असून मुस्लिम व इतर समाजातील जन्मदरही कमी होऊ लागला आहे. त्यामुळे किमान ३ अपत्ये जन्माला घातली पाहिजेत.संविधानातील आरक्षणाला पाठिंबाच
संविधानाने ज्या समाजांना आरक्षण दिले आहे, ते कायम राहिले पाहिजे. या आरक्षणाच्या तरतुदीला संघाचा पाठिंबा होता व राहील. जोपर्यंत या आरक्षणाची गरज असेल तोपर्यंत आरक्षण असले पाहिजे. काही समाजांवर वर्षानुवर्षे अन्याय झाला, त्यांच्यासाठी आरक्षण दिले तर काही बिघडत नाही, उच्चवर्णीयांना जर आरक्षण अन्याय वाटत असेल तर त्यांनी तो २०० वर्षे सहन केला तरी चालेल, अशी भूमिका भागवत यांनी मांडली.