Mohan Bhagwat on Hindu Rashtra : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत हे सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त ते देशभर फिरत आहेत. दरम्यान, त्यांनी मंगळवारी (१८ नोव्हेंबर ) गुवाहाटी येथे बुद्धिजीवी, विद्वान, संपादक, लेखक व उद्योजकांसह प्रतिष्ठित लोकांच्या समूहाला संबोधित केलं. या संवादात्मक सत्रात त्यांनी संघाच्या संस्कृतीविषयक दृष्टीकोनावर, राष्ट्रीय आव्हानांवर, ईशान्येकडे संघाच्या चालू असलेल्या कार्यक्रमांवर चर्चा केली. ते यावेळी म्हणाले, “ज्याला भारताचा अभिमान आहे, ज्याचं भारतावर प्रेम आहे तो हिंदू आहे. मग त्याची वैयक्तिक उपासनेची, प्रार्थनेची पद्धत कुठलीही असो, तो हिंदूच आहे.”
मोहन भागवत म्हणाले, “हिंदू हा केवळ धार्मिक शब्द नाही तर ही हजारो वर्षांची संस्कृती आहे. भारत व हिंदू हे समानार्थी शब्द आहेत. भारताला हिंदू राष्ट्र होण्यासाठी कुठल्याही अधिकृत घोषणेची गरज नाही. इथली सभ्यता व संस्कृती पाहता ते स्पष्टच आहे.”
“भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मूळ तत्वज्ञान स्पष्ट करताना सरसंघचालक म्हणाले, “ही संघटना कोणाचाही विरोध करण्यासाठी, कोणाचंही नुकसान करण्यासाठी, कोणालाही कुठलीही इजा पोहोचवण्यासाठी नव्हे तर एक प्रगत समाज व व्यक्ती निर्माण करण्यासाठी सुरू झाली आहे. वैयक्तिक चारित्र्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी व भारताला विश्वगुरू बनवण्यात योगदान देण्यासाठी ही संघटना उभी राहिली आहे.”
संघ समजून घेण्यासाठी संघाच्या शाखेला भेट द्या : सरसंघचालक
“कोणलाही संघाबद्दल समजून घ्यायचं असेल तर कुठल्याही कपोकल्पित अथवा पसरवलेल्या कथांवर अवलंबून न राहता संघाच्या शाखांमध्ये उपस्थित राहून संघ समजून घ्यावा. कारण विविधतेमध्ये भारताला एकत्र आणण्याच्या व्यवस्थेला आरएसएस म्हणतात.”
आपण कुटुंब संस्था मजबूत करण्यावर विशेष लक्ष द्यायला हवं : मोहन भागवत
मोहन भागवत यांनी यावेळी पाच सामाजिक बदलांबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सामाजिक सुसंवाद, कुटुंब प्रबोधन, नागरी शिस्त, स्वावलंबन आणि पर्यावरण संरक्षण याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. यापैकी कुटुंब संस्था मजबूत करण्यावर विशेष भर द्यायला हवा. प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या पूर्वजांचा इतिहास जोपासावा, तरुण पिढीमध्ये जबाबदारी व सांस्कृतिक अभिमान निर्माण करावा.”
