जिथं धडधाकट माणसं आपलं कर्तव्य पार पाडताना कसूर करतात, तिथं मृत्यूच्या दाढेत असलेल्या एका व्यक्तीने अनेकांचे जीव वाचविले आहेत. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळे अनेकजण हळहळले. बालासोर जिल्ह्यात एका बस चालकाला धावत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका आला, मात्र तरीही आपली कर्तव्यनिष्ठा न सोडता बस चालकाने बसमध्ये बसलेल्या ६० लोकांचा जीव वाचविला.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एका बस चालकाला बस चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका आला. आपल्याला अस्वस्थ वाटतंय, हे जाणवू लागताच सदर चालकाने बस तात्काळ थांबविली. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या तब्बल ६० प्रवाशांचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने बस चालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर बस पश्चिम बंगालमधून पर्यटकांना घेऊन बालासोर जिल्ह्यातील पंचलिंगेश्वर मंदिराकडे निघाली होती. तेव्हा वाटेतच चालकाला हृदयविकाराचा झटका आला.
पोलिसांनी पुढे सांगितले की, चालकाला छातीत दुखू लागल्यानंतर त्याने तात्काळ बस थांबविली आणि त्यानंतर तो बेशूद्ध झाला. या घटनेनंतर बसमधील प्रवाशांनी स्थानिकांच्या मदतीने चालक शेख अख्तर याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बसमधील एक प्रवासी अमित दास यांनी सांगितले की, आम्ही पाहिले की, चालकाला अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्याने अचानक ब्रेक थांबवून बस थांबविली. रस्त्याच्या कोपऱ्याला बस थांबविल्यानंतर चालक अचानक बेशूद्ध पडला. आम्ही त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.