मोसमी पावसाला आता परतीचे वेध लागले असून र्नैऋत्य मोसमी पाऊस १५ सप्टेंबरच्या आसपास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी सांगितले. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून १५ सप्टेंबरच्या आसपास पावसाची माघारीसाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचे आयएमडीने सांगितले.

मोसमी पाऊस साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश होतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात व्यापतो. तर १७ सप्टेंबरच्या आसपास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेतो.

या वर्षी मान्सूनने ८ जुलै या सामान्य तारखेच्या नऊ दिवस आधी संपूर्ण देश व्यापला होता. संपूर्ण देश व्यापणारा २०२० नंतर हा सर्वात पहिला मान्सून होता. त्या वर्षी मान्सूनने २६ जूनपर्यंत संपूर्ण देश व्यापला होता. यंदा २४ मे रोजी केरळमध्ये पोहोचला, जे २००९ नंतर भारतात त्याचे सर्वात पहिले आगमन होते. २००९ मध्ये, मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

सामान्यपेक्षा ७ टक्के अधिक

– यंदा देशात आतापर्यंत ८३६.२ मिमी पाऊस पडला असून जो ७७८.६ मिमीच्या सामान्य पावसापेक्षा ७ टक्के जास्त आहे.

– जून-सप्टेंबरमध्ये भारतात ८७ सेंमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली होती.

– वायव्य भारतात ७२०.४ मिमी, जो सामान्य ५३८.१ मिमी पावसापेक्षा ३४ टक्के जास्त आहे.

– मध्य भारतात आतापर्यंत ९७८.३ मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्य ८८२ मिमीपेक्षा ११ टक्के जास्त आहे.

– दक्षिण द्वीपकल्पात सामान्य ६११ मिमीपेक्षा ७ टक्के जास्त पाऊस पडला.

– पूर्व आणि ईशान्य भारतात ९४९.६ मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्य ११९२.६ मिमीपेक्षा २० टक्के कमी आहे.

– पन्नास वर्षांच्या सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस ‘सामान्य’ श्रेणी मानला जातो.

अतिवृष्टीचे कारण

भारतीय हवामान खात्याने या अतिवृष्टीचे कारण सक्रिय मान्सून असल्याचे सांगितले. वारंवार पश्चिमी विक्षोभ (कमी दाबाची हवामान प्रणाली जी भूमध्य समुद्रात उगम पावतात.) होत असल्याने प्रदेशात पाऊस वाढला, असे सांगण्यात आले. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वाचा असून तो सुमारे ४२ टक्के लोकसंख्येच्या उपजीविकेचा आधार आहे आणि जीडीपीमध्ये १८.२ टक्के योगदान देतो.

उत्तर भारतात कहर

– पंजाबमध्ये दशकांमधील सर्वात मोठ्या पुराचा सामना करावा लागला. राज्यात नद्यांनी ओलांडलेली पातळी, आणि फुटलेल्या कालव्यांमुळे हजारो हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेली आणि लाखो नागरिक विस्थापित झाले.

– हिमालयीन राज्यांमध्ये, ढगफुटी आणि अचानक आलेला पूर, भूस्खलन यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

– हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूल आणि रस्ते वाहून गेले, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये वारंवार ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या.