अमेरिकेतील नवउद्योजकाकडून आगळ्यावेगळ्या पादत्राणाची निर्मिती
सध्या आपल्याकडे नवउद्योगांची चर्चा आहे, त्यात वेगळ्या कल्पनांना प्राधान्य असते व त्या व्यावसायिक पातळीवर यशस्वी होणे आवश्यक असते. आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत असे आपण नेहमी म्हणतो, पण आता मूनवॉकर बूट घालणाऱ्यांचे पाय जमिनीवर असणार नाहीत. अमेरिकेत एका नवोद्योगाने जगावेगळी पादत्राणे तयार केली आहेत; ते बूट असून त्यांच्या मदतीने कमी गुरूत्वाचा म्हणजे चंद्रावर चालल्यासारखा अनुभव येतो. हे बूट २०-१६ मूनवॉकर नावाने बाजारात आणले आहेत.
हे बूट एम ४५ निओडायमियम चुंबकावर आधारित आहेत. हे चुंबक फार शक्तिशाली असतात. चुंबकाचे एन ३०, एन ४२, एन ४५ असे प्रकार असतात. चुंबकाची शक्ती ही त्यातील नियोडायमियम, लोह, बोरॉन यांच्या मिश्रणावर ठरते, असे अभियंता पॅट्रिक ज्रेजिरी यांनी सांगितले, त्यांनी या बुटांची निर्मिती केली आहे.
एन ४५ चुंबक शक्तिशाली व तुलनेने स्वस्तही असतात म्हणून त्यांचा वापर केल्याचे त्यांनी ‘लाइव्ह सायन्स’ या नियतकालिकाला सांगितले. असे १२ ते १३ चुंबक एका थरात लावले जातात, दुसऱ्या थरातही १२ ते १३ चुंबक असतात.
हे दोन्ही थर एकमेकांना दूर ढकलतात कारण त्यांच्यात प्रतिकर्षण तयार होते. ते एकमेकांना दूर सारत असल्याने आपण तरंगतो. या चुंबकांचे उत्तर ध्रुव एकमेकांशी जुळवलेले असतात. हे चुंबक अडीच ते पाच सें.मी. व्यासाचे असतात. ५ सें.मी. व्यासाचे चुंबक शक्तिशाली असतात, ते १२ किलो वजनही दूर ढकलू शकतात तर २.५ से.मी चे चुंबक २४ किलो वजन दूर ढकलू शकतात. चुंबक आपल्या पायाच्या क्षेत्रफळातील सर्व वजन वर ढकलतात.
चुंबकाच्या दोन थरांमध्ये एक उशी तयार होते व त्यामुळे माणूस चालताना त्याचे पाय जमिनीला टेकत नाहीत. मूनशाईन क्रिया या कंपनीने हे बूट तयार केले असून मूनवॉकर बूट घातल्यानंतर तुमचे वजन किती आहे याचा फरक पडत नाही कारण १८३ किलोइतके वजन चुंबकाच्या दोन थरातील प्रतिकर्षणाने तोलले जाते. त्यापुढच्या वजनाला मात्र चुंबक काम करीत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moonwalker shoes gives experience of walkng on the moon
First published on: 10-02-2016 at 03:58 IST