पीटीआय, पेशावर

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे किमान १५४ लोकांचा बळी गेला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतात ढगफुटी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. यात अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील कराकोरम महामार्ग आणि बाल्टिस्तान महामार्ग यांसारखे महत्त्वाचे रस्ते अडकले आहेत.

स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वामधील बुनेर जिल्ह्यात ७५, मनसेहरामध्ये १७, तर बाजौर आणि बटाग्राम जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते फैझी यांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवार रात्रीपासून सुरू असलेल्या ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे लहान मुलांसह १२५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक आणि स्थानिक रहिवाशांनी मृतदेह बाहेर काढले आहेत. ते पुढे म्हणाले की, अनेक लोक अजूनही बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.