धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी २०१८ ते २०२० या तीन वर्षाच्या कालावधीत ४७९४ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारकडून ही आकडेवारी देण्यात आली.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहिती नुसार, २०१८-२० या तीन वर्षाच्या कालावधीत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी ४७९४ आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी २०१८ मध्ये१७१६ जणांना, २०१९ मध्ये १३१५ जणांना तर २०२० मध्ये १७६३ जणांना अटक आली.

हेही वाचा – करोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार, अमित शाह यांचं मोठं विधान

या गुन्ह्यांची सर्वात जास्त नोंद उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तीन वर्षात ६२८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर त्यानंतर तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशचा नंबर लागतो. या राज्यामध्ये अनुक्रमे ६१३, ५५२, ३८३ जणांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणा, गुजरात आणि राजस्थान यासह इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये या गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. आसाममध्ये ३५१ जणांना अटक करण्यात आली आहे, तर मणिपूरमधून २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

गोव्यात केवळ दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये तीन वर्षात एकूण ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतून ३१ जणांना धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे लडाख, पुडुचेरी, लक्षद्वीप आणि चंदीगड या प्रकरणी एकही गुन्ह्याची नोंद झाली नाही.