पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. पंतप्रधानांसह इतर उच्चपदस्थांना मिळालेल्या भेटवस्तू, सन्मानचिन्हांच्या संग्रहालयास ‘तोशखाना’ म्हणतात. या भेटवस्तूंपैकी काही मौल्यवान वस्तू सवलतीत घेऊन त्या अधिक दरात विकल्याचा इम्रान यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना संसद सदस्यत्वासाठी अपात्र ठरवल्यानंतर आयोगाने हे पुढील पाऊल उचलले आहे.

‘डॉन’ वृत्तपत्राने वृत्त दिले आहे, की इम्रान खान यांना या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे आणि या प्रकरणाची सुनावणी १३ डिसेंबर रोजी होणार आहे. इम्रान खान (खान) यांच्यावर पंतप्रधान म्हणून मिळालेली महागडी घडय़ाळे आणि इतर भेटवस्तू तोशाखान्यातून सवलतीच्या दरात विकत घेऊन ती महाग दरात विकून नफा कमावल्याचा आरोप आहे.

 पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना पाकिस्तानी राज्यघटनेच्या अनुच्छेद ६३ अन्वये (आय) (पी) या संदर्भात चुकीचा जबाब व खोटी माहिती जाहीर केल्याचा आरोप करून अपात्र ठरवले आहे. निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार, १९७४ मध्ये स्थापन झालेल्या तोशखान्यातून दोन कोटी १५ लाख रुपयांच्या वस्तू इम्रान यांच्याकडून खरेदी करण्यात आल्या होत्या, तर त्यांची वास्तविक किंमत दहा कोटी आठ लाख रुपये होती. पाकिस्तानी कायद्यानुसार, सरकारी अधिकारी व मंत्र्यांना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू त्यांच्याकडे ठेवण्यापूर्वी मूल्यांकनासाठी तोशखाना किंवा तिजोरीत जमा कराव्या लागतात. तोशाखाना वस्तू विक्रीचे वृत्त प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध आल्यानंतर पाकिस्तानचे सरकार आणि विरोधकांत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.

‘नव्या लष्करप्रमुखांवर इम्रान यांनी टीका करू नये’; पाकिस्तानच्या अध्यक्षांचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना नवे लष्करप्रमुख असिम मुनिर यांच्यावर टीका न करण्याचा सल्ला पाकिस्तानचे अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी दिला आहे. आपले पक्ष कार्यकर्ते आणि समाजमाध्यम शाखेला नवनियुक्त लष्करप्रमुखांवर टीका न करण्याच्या सूचना देण्यास इम्रान यांना अल्वी यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. एप्रिलमध्ये पंतप्रधानपद सोडावे लागल्यानंतर इम्रान त्यासाठी लष्कराला जबाबदार धरत असून, आपल्याविरुद्ध अविश्वास ठराव आणून पदत्याग करण्यास भाग पाडण्यात लष्कराचा हात असल्याचा आरोप ते सातत्याने करत आहेत.