मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील कुब्री गावात एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ काल (४ जुलै) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाई केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
“या तरुणाचं नाव प्रविण शुक्ला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल”, अशी माहिती सिधीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनुजालता पटले यांनी दिली. आरोपीविरोधात सिधी येथील स्थानिक पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम २९४ आणि ५०४ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “या घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार या आरोपीला सोडणार नाही. या आरोपीला शिक्षा सुनावून प्रत्येकाला नैतिकतेचा धडा शिकवला जाईल. आरोपीला कोणताही धर्म, जात किंवा पक्ष नसतो. आरोपी हा आरोपी असतो.”
व्हिडीओत काय आहे?
एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली आहे. आरोपीनं पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघवी केली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावचा आहे. तो मजुरीचं काम करते.