MP Shashi Tharoor to host TV series TV series on Colonial rule Imperial Receipts marathi news : काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर हे त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते एक उत्तम वक्ते आहेत. तसेच त्यांनी काही पुस्तकांचे लेखन देखील केले आहे. आता थरूर हे एका ऐतिहासिक डॉक्यूमेंटरी सीरीजच्या माध्यमातून देशाच्या समोर आले आहेत. त्यांच्या या शोचे नाव हे ‘इम्पीरियल रिसीप्ट्स विथ डॉ. शशी थरूर’ असे आहे. या सीरीजचे प्रक्षेपण रशियाची सरकारी वृत्तवाहिनी रशिया टुडे (आरटी) आणि आरटी इंडियावर केले जाणार आहे. तसेच थरूर यांच्या यूट्यूब चॅनलवर देखील हा शो पाहाता येणार आहे.

शशी थरूर यांच्या या शोचा पहिला भाग उपलब्ध झाला असून दुसरा भाग उद्या म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे. याबद्दल थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

थरूर काय म्हणाले?

शशी थरूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये इंग्रजांच्या राजवटीने भारताची जी गोष्ट दडवून ठेवली ती या शोमधून पाहाता येईल असेही त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “त्यांनी राज्य केले. त्यांनी लुटले. आणि त्यांचा वारसा अजूनही टिकून आहे. वसाहतवादी राजवट ही काही राज्यकारभार चालवण्यासाठी नव्हती, तर ती शोषण, पिळवणूक आणि भारताचा इतिहास पुन्हा लिहिण्यासाठी होती. माझी नवीन टीव्ही सीरिज #ImperialReceipts बघा आणि या साम्राज्याने दडवून ठेवलेली गोष्ट पाहा,” असे शशी थरूर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या बरोबरच थरूर यांनी त्यांच्या शोचा लहानसा टिझर देखील शेअर केला आहे.

या सीरिजचा पहिला भाग आला असून तो माझ्या यूट्यूब चॅनेलरवर उपलब्ध आहे. दुसरा भाग उद्या, सोमवार ८ तारखेला, संध्याकाळी ७ वाजता प्रदर्शित होत आहे, असेही शशी थरूर म्हणाले आहेत.