करोना विषाणूमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१चा हंगाम मध्येच पुढे ढकलण्यात आला. या काळात लीगमध्ये २९ सामने खेळले गेले. मागील वर्षी खराब कामगिरी केलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी (सीएसके) यंदाचा हंगाम चांगला गेला. संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दमदार कामगिरी नोंदवली. जडेजाची तलवारबाजी प्रसिद्ध आहे. तो मैदानातही तलवारीप्रमाणे बॅट फिरवतो. त्याची हीच स्टाइल आता कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कॉपी केली आहे. सीएसकेने धोनीचा जडेजाची नक्कल करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये धोनी जडेजासारख्या तलवारबाजीचे अनुकरण करताना दिसत आहे. अर्धशतक किंवा शतक केल्यानंतर जडेजा तलवारीसारखी बॅट फिरवतो. त्याची ही स्टाइल जगभर प्रसिद्ध आहे.

 

जडेजाची दमदार कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोटाच्या दुखापतीनंतर जडेजाने आयपीएल २०२१मध्ये दमदार पुनरागमन केले. संपूर्ण स्पर्धेत त्याचे क्षेत्ररक्षण उत्तम ठरले. जडेजाने यंदाच्या हंगामात ७ सामन्यात १३१ धावा केल्या. जडेजा ५ सामन्यात नाबाद होता आणि त्याने एक अर्धशतकही ठोकले होते. जडेजानेही ७ सामन्यांत ६ बळी मिळवले. जडेजाने यंदाच्या हंगामात एकूण ८ झेल घेतले. एका सामन्यात तो ४ झेल पकडण्यात यशस्वी झाला. जडेजा आता इंग्लंड दौर्‍यावर दिसणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात चांगली कामगिरी बजावली. संघाने ७ पैकी ५ सामने जिंकले आणि गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले.