Muhammad Yunus Called PM Narendra Modi : शेजारील हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१५ ऑगस्ट) लाल किल्ल्यावर व्यक्त केली होती. त्यानंतर, आज बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि येथील अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. मोदींनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.

“प्राध्यापक मुहम्मद युनूस यांचा दूरध्वनी आला. प्रचलित परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली. लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशासाठी भारताच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सुरक्षेचे आश्वासन त्यांनी दिले”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मंगळवारी युनूस यांनी राजधानी ढाका येथील ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. तेव्हा त्यांनी बांगलादेशातील हिंदूंशी संपर्क साधला होता. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या हिंसाचारात अल्पसंख्याकांवर हल्ले करणाऱ्यांना शिक्षा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा >> Bangladesh Hindu: बहुसंख्य असलेले हिंदू आज ठरले अल्पसंख्याक; काय आहे बांगलादेशमधील हिंदूंची स्थिती?

आपण सर्व एकच

५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारच्या पतनानंतर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना ५० जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. पोलीस यंत्रणा कोलमडल्याने, हिंदू कुटुंबे, संस्था आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेकांना प्राण गमवावा लागला. बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी मंगळवारी ढाका येथील ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली आणि हिंदू समुदायाच्या नेत्यांना आश्वासन दिले की, “आपण सर्व एकच आहोत” आणि “सर्वांना न्याय दिला जाईल”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेशच्या आठ विभागांमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येचे प्रमाण बदलत जाते. मैमनसिंगमध्ये फक्त ३.९४% हिंदू आहेत तर तेच प्रमाण सिल्हेटमध्ये १३.५१ % आहे. बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक पाचवी व्यक्ती हिंदू आहे. ढाका विभागातील गोपालगंज (जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या २६.९४% हिंदू आहेत), सिल्हेत विभागातील मौलवीबाजार (२४.४४% हिंदू आहेत), रंगपूर विभागातील ठाकूरगाव (२२.११% हिंदू आहेत) आणि खुलना विभागातील खुल्ना (२०.७५% हिंदू आहेत) हे काही महत्त्वाचे विभाग आहेत. २०२२ च्या गणनेनुसार १३ जिल्ह्यांमध्ये हिंदू लोकसंख्या १५% पेक्षा जास्त आणि २१ जिल्ह्यांमध्ये १०% पेक्षा जास्त होती.