आयपीएलच्या नव्या पर्वाला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहेत. या लीगमधील सर्व संघ जय्यत तयारी करत आहेत. सरावानंतर सर्व संघ जाहिरात प्रमोशन, फोटोशूट यात व्यस्त आहेत. अशातच पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात मुंबईचे खेळाडू एका आगरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

सुप्रसिद्ध आगरी गीत ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ या गाण्यावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पंड्या बंधू थिरकताना दिसत आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिसाद दिला आहे. खरे तर, या व्हिडिओतील गाणे आणि डान्स वेगळा असून चांहत्यांना कोणाची स्टेप जास्त आवडली, असा सवाल मुंबईने कॅप्शनमध्ये विचारला आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

 

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आठ वर्षातच त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनवले. 2008 ते 2012 या पाच वर्षांत मुंबईकडे आयपीएलचे एकही विजेतेपद नव्हते. त्यानंतर मुंबईने झटपट पाच विजेतेपदे नावावर केली आणि या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून किताब मिळवला.

गतविजेत्या मुंबईचा पहिला सामना 9 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी चेन्नईत होणार आहे. मुंबईच्या संघात रोहित शर्मा, क्रुणाल पंड्या, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत.

मुंबईचे नवे खेळाडू –

  • नाथन कुल्टर नाइल – 5 कोटी
  • एडम मिल्ने – 3.20 कोटी
  • पीयुष चावला 2.20 कोटी
  • युद्धवीर चरक – 20 लाख
  • मार्को जेनिसन – 20 लाख
  • अर्जुन तेंडुलकर – 20 लाख
  • जेम्स नीशम – 50 लाख