Uttar Pradesh Fake Doctor : उत्तर प्रदेशमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बनावट डॉक्टराचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी एका बनावट डॉक्टरला बेड्या ठोकल्या असून या संपूर्ण प्रकरामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असता हा निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील बस्ती येथील जिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये एका रुग्णावरील उपचारादरम्यान बनावट डॉक्टर पकडला गेला आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, यावेळी या बनावट डॉक्टरचा भांडाफोड झाला. कुटुंबीयांनी आरोप केला की तिला जवळपास दोन तास उपचार न देता रुग्णालयात ठेवण्यात आलं. मात्र, काही वेळाने तिचा मृत्यू झाला. या दरम्यान बनावट डॉक्टर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेशात आपत्कालीन वॉर्डमध्ये फिरत होता. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, राज कुमार असं त्याचं नाव असून तो डॉक्टरांखे कपडे घालून रुग्णालयात वावरत होता. यावेळी त्या बनावट डॉक्टरने मास्क, स्टेथोस्कोप घातलेला होता. एवढंच नाही तर तो वॉर्डमध्येही फिरत होता. तो स्वतःला एक वरिष्ठ डॉक्टर म्हणून सांगत रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत होता. यामध्ये रुग्णालयातील गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांचाही समावेश होता. पण याचवेळी एका रुग्णाच्या कुटुंबियाने त्या डॉक्टरला काही औषधे लिहून देण्यास सांगितले. पण त्याने वॉर्डनला विचारून सांगतो असं उत्तर दिलं अन् त्याचा भांडाफोड झाला.
त्या डॉक्टरने दिलेल्या उत्तरामुळे कुटुंबियांना त्या डॉक्टराच्या पात्रतेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर त्या डॉक्टरला नातेवाईकांनी पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलीस आल्यानंतर बनावट डॉक्टरचा पर्दाफाश झाला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचे एसआयसी डॉ. खालिद रिझवान यांनी या संपूर्ण घटनेची पुष्टी केली आहे.
डॉ. खालिद रिझवान यांनी म्हटलं की, “डॉक्टर असल्याचं भासवून वॉर्डमध्ये एक अज्ञात व्यक्ती वावरत असल्याची माहिती मिळाली. त्या व्यक्तीला लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.” दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या आरोपावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “मृत रुग्णाची प्रकृती आधीच गंभीर होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि तिची ऑक्सिजन पातळी खाली आली होती. तिला योग्य ते उपचार देण्यात येत होते. मात्र, तिचा मृत्यू झाला.”